अंकुश गुंडावार ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातंर्गत राबविण्यात आलेल्या बदली प्रक्रियेदरम्यान ७२ शिक्षकांनी बदलीसाठी खोटी प्रमाणपत्रे जोडल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले होते. दरम्यान यापैकी ४३ शिक्षकांनी खोटी प्रमाणपत्रे जोडल्याचे सिध्द झाले असून त्यांच्यावर कारवाही करण्यासाठी फाईल जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी एम.राजा. दयानिधी यांच्याकडे पाठविण्यात आली. त्यामुळे या ४३ शिक्षकांवर निलंबनाची कारवाही होण्याची शक्यता आहे.जि.प.प्राथमिक शिक्षक विभागातर्फे जून महिन्यात शिक्षकांची आॅनलाईन बदली प्रक्रिया राबविण्यात आली. यात जवळपास दोन हजार शिक्षक बदलीस पात्र ठरले होते. बदलीची संपूर्ण प्रक्रिया आॅनलाईन पध्दतीने राबविली जात असल्याने यात घोळ होण्याची शक्यता नव्हती. मात्र काही शिक्षकांनी आपल्या सुपीक डोक्यातून यावर सुध्दा रामबाण उपाय शोधून काढला. काही शिक्षकांनी आपली बदली दुर्गम व आदिवासी बहुल भागात होवू नये, यासाठी तर काहींनी आपल्याला मर्जीच्या ठिकाणी जाता यावे, यासाठी बदली अर्जासोबत गंभीर व दुर्धर आजार असल्याचे खोटे प्रमाणपत्र तयार करुन जोडले.त्यामुळे या शिक्षकांना त्यांच्या मर्जीच्या ठिकाणी जाण्याचा मार्ग सुकर झाला. मात्र याचा सर्वाधिक फटका बदलीपात्र असलेल्या शिक्षकांना बसला. तसेच पती-पत्नी एकत्रीकरणातंर्गंत शिक्षकांना बसला. बदली प्रक्रिेये दरम्यान काही शिक्षकांनी सेटींग केल्याने अनेक शिक्षकांवर विस्थापित होण्याची पाळी. दरम्यान यामुळे शिक्षकांमध्ये रोष निर्माण झाला. त्यांनी या सर्व बदली प्रक्रियेवर आक्षेप घेतला. तसेच शिक्षकांनी बदलीसाठी जोडलेल्या प्रमाणपत्रांची तपासणी करण्याची मागणी शिक्षणमंत्री व शिक्षण विभागाकडे लावून धरली.शिक्षकांचा दबाव वाढल्यानंतर शिक्षण विभागाने तालुकानिहाय शिक्षकांच्या बदली अर्ज आणि त्यांनी जोडलेल्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचे काम सुरू केले. त्यामध्ये प्राथमिक चौकशीत ७२ शिक्षक दोषी आढळले होते. मात्र त्यांतर शिक्षण विभागाने या अर्जांची व प्रमाणपत्रांची पडताळणी केली असता यापैकी ४३ शिक्षकांनी बदलीसाठी खोटी प्रमाणपत्रे जोडल्याचे सिध्द झाले.दरम्यान यासर्वांचा अहवाल तयार करुन त्यांच्यावर कारवाही करण्यासाठी त्याची फाईल मंगळवारी (दि.७) जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी दयानिधी यांच्याकडे सादर करण्यात आली. त्यामुळे या शिक्षकांवर शिस्तभंगाची अथवा निलबंनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. त्याला शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुध्दा दुजोरा दिला.दुसऱ्या टप्पातील पडताळणी सुरूजून महिन्यात राबविण्यात आलेल्या आॅनलाईन बदली प्रक्रियेत जिल्ह्यातील दोन हजारावर शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. दरम्यान शिक्षकांनी या बदली प्रक्रियेवर आक्षेप घेतल्यानंतर पहिल्या टप्प्यात ४३ शिक्षकांवर कारवाही होण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील अर्जांची पडताळणी सुरू असून लवकरच त्याचा अहवाल येण्याची शक्यता आहे.त्यामुळे कारवाही होणाऱ्या शिक्षकांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
बदली प्रक्रियेदरम्यान ४३ शिक्षकांनी खोटे प्रमाणपत्र जोडल्याचे सिध्द झाले असून त्यांच्यावर कारवाही करण्याचा प्रस्ताव जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर केला आहे.- उल्हास नरड, प्राथमिक शिक्षणाधिकारी गोंदिया.