नरेश रहिले गोंदियागाव शांततेतून समृद्धीकडे जावे यासाठी राज्य शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम अंमलात आणली. या मोहिमेमुळे ग्रामीण भागातील तंटे मोठ्या प्रमाणात कमी झाले. गोंदिया जिल्ह्यातील तंटामुक्त गावांचे सर्वेक्षण केल्यावर ५६६ पैकी ४३३ गावे आजही शांततेच्या मार्गावर असून त्या गावातील एकही तंटे पोलीस ठाण्यापर्यंत आले नाही. १२३ गावात तंटे झाल्याचे लक्षात आले.राज्य शासनाने १५ आॅगस्ट २००७ पासून राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली. या मोहिमेला राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात भरभरुन प्रतिसाद मिळाल्यामुळे १५ लाखावरील तंटे समोपचाराने मिटविण्यात आले. या मोहिमेला लोकचळवळीचा आधार मिळाला. या मालिकेत गोंदिया जिल्हा राज्यातील पहिला तंटामुक्त होणारा जिल्हा म्हणून नावारुपास आला. राज्यातील १८ हजारापेक्षा अधिक गावे तंटामुक्त पुरस्कारासाठी पात्र ठरली. परंतु तंटामुक्त पुरस्काराचे मानकरी ठरलेली गावे खरच तंटामुक्त आहेत का? या गावात तंटे झाले का? याचे सर्वेक्षण राज्यभरात पोलीस विभागातर्फे करण्यात आले. तंटामुक्त सेलला मागितलेल्या सर्वेक्षणात अजूनही जिल्ह्यातील तंटामुक्त गावात तंटे उद्भवत असल्याची माहिती पुढे आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील ५५६ गावांपैकी ४३३ गावात एकही तंटा झाला नाही. तर १२३ गावात तंटे झाले असल्याचा अहवाल गोंदिया पोलीस विभागाने राज्य शासनाच्या गृहमंत्रालयाला पाठविला आहे. ३ जानेवारी २०१४ च्या पत्रान्वये हे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात देवरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या १२ गावात, दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ११ गावात, रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सात गावात, गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सहा गावात, अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या १९ गावात, आमगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पाच गावात, नवेगावबांध पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चार गावात, सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सहा गावात, चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या दोन गावात, गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सहा गावात, गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या १२ गावात तर तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या २४ गावात तंटे झाले आहेत. तंटामुक्त पुरस्काराचे मानकरी असलेली ४३३ गावातील तंटामुक्त समितीच्या सदस्यांनी व नागरिकांनी पुरस्काराचे पावित्र्य राखून आपल्या गावातील तंटे पोलीस ठाण्यापर्यंत जाऊ दिले नाही. गोंदिया जिल्हा आता व्यसनमुक्त जिल्ह्याच्या दिशेने वाटचाल करीत आहेत.
४३३ गावात नांदू लागली शांतता
By admin | Published: December 28, 2015 2:04 AM