महावितरणची विशेष मोहीम : देवरी विभागातील शेतकऱ्यांना दिलासा लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : पीकांच्या चिंतेने अगोदरच ग्रस्त असलेल्या शेतकऱ्याला दिलासा म्हणून महावितरणच्यावतीने शेतकऱ्यांचे नादुरूस्त कृषी पंप मीटर बदलण्याची विशेष मोहीम घेण्यात आली. देवरी विभागाने ११ ते १३ मे या दरम्यान घेतलेल्या या मोहिमेत विभागातील ४५० शेतकऱ्यांचे नादुरूस्त कृषीपंप मीटर बदलवून देण्यात आले. सध्या शेतकऱ्यांसाठी हा काळ अत्यंत महत्वाचा आहे. उन्हाळी पिकांना वेळीच योग्य त्या प्रमाणात पाणी मिळाल्यास शेतकरी चांगले उत्पन्न घेऊन आपल्यावरील कर्जाचा बोझा काही प्रमाणात कमी करण्याच्या स्थितीत येऊ शकेल. मात्र कित्येक शेतकऱ्यांच्या वीज कंपनीला घेऊन तक्रारी आहेत. सोबतच कित्येकांचे कृषीपंपाचे वीज मीटर नादुरूस्त असून पैसे लागणार यामुळे शेतकरी काहीच बोलण्याच्या स्थितीत नाही. अशा नाजूक समयी शेतकऱ्यांची ही स्थिती ओळखून महावितरणने शेतकऱ्यांना फुल ना फुलाची पाकळी एवढी मदत करण्याच्या उद्देशातून ही विशेष मोहीम घेतली. प्राथमिक स्तरावर देवरी विभागांतर्गत ही मोहीम घेण्यात आली. या मोहिमेंतर्गत शेतकऱ्याच्या वीज बिलासंबंधीत तक्रारींचे निवारण तर करण्यात आलेच. शिवाय शेतीपंपांचे नादुरूस्त मीटर त्यांना एक पैसा न लागू देता त्वरीत बदलवून देण्यात आले. परिणामी या मोहिमेतून ४५० शेतकऱ्यांचे नादुरूस्त कृपीपंप मीटर बदलविण्यात आले आहे. तर सोबतच कृषीपंप वीज ग्राहकांना त्यांच्या कृषीपंपाच्या वीज बिलासंबंधी सर्व प्रकारच्या तक्रारींसाठी व नादुरूस्त मीटर बदलविण्यासाठी वितरण केंद्रात संपर्क साधण्याची सुविधाही देण्यात आली आहे. ही मोहीम गोंदिया परिमंडळाचे मुख्य अभियंता जे.एम.पारधी गोंदिया मंडळाचे अधीक्षक अभियंता एल.एम.बोरीकर यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आली. यात देवरी विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एम.वाकडे, अतिरीक्त कार्यकारी अभियंता तेलंग, उप कार्यकारी अभियंता परिहार, शेख, जनबंधू, बडोले, सहायक अभियंता बहादुरे, वाटेकर, टांगले, लाईनमन बांते, भर्रे, कोरचे, राऊत, ठवकर, पठाण व ताजणे यांनी भाग घेतला. महावितरणकडे १५०० मीटर रिझर्व्ह देवरी विभागात कृषीपंप वीज मीटर धारक शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्याने महावितरणने मोहीम प्राधान्याने देवरी विभागात राबविली. मोहिमेंतर्गत शेतकऱ्यांचे नादुरूस्त मीटर बदविताना मीटर कमी पडू नये यासाठी परिमंडळाला १५०० मीटर वेगळे देण्यात आले होते. यातूनच नादुरूस्त मीटर बदलविण्याचे नि:शुल्क कार्य केले जात आहे. शेतकऱ्यांची समस्या सोडविण्यासाठी महावितरण पुढे आले. तर त्यानुसार शेतकऱ्यांनीही त्यांच्याकडील वीज बील मुदतीच्या आत भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
४५० नादुरूस्त वीज मीटर बदलले
By admin | Published: May 18, 2017 12:09 AM