नरेश रहिले - गोंदियामहात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेने गावात शांतता व समृद्धीची लाट आणली. ही मोहीम राबविणाऱ्या गावांना शासनाने लोकसंख्येच्या आधारावर पुरस्कार वाटले. सन २०१२-१३ या वर्षात राज्यातील ३ हजार ८६५ गावे स्पर्धेत होती. यातील १ हजार ७४१ गावांना तंटामुक्तीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या गावांना बक्षीसापोटी महाराष्ट्र शासन ४६ कोटी ५९ लाख ७५ हजार रुपये देणार आहे.महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम महाराष्ट्र शासनाने १५ आॅगस्ट २००७ मध्ये सुरु केली. गावातील तंटे गावातच समोपचाराने सोडविल्या जावे. न्यायालय व पोलिसांच्या कामाचा ताण कमी व्हावा, यासाठी शासनाने सुरु केलेल्या मोहीमेला लोकचळवळीचा आधार मिळाला. लोकचळवळ उभी झाल्याने या योजनेला राज्यभर उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला. परिणामी १० लाखाहून अधिक तंटे सामोपचाराने सोडविल्या गेले. ज्या गावात अंतर्गत कलह होता तो संपुष्टात आला. जातीय दंगलीवर नियंत्रण आनण्याचे काम तंटामुक्त समित्यांनी केले. सोबतच गावातील तंटे गावातच सामोपचाराने सोडविल्या बरोबर प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याचे कार्य तंटामुक्त समित्यांनी केले. ज्या गावाची शांतता व सुव्यवस्था धोक्यात येत होती. त्या गावात आता शांततेची गंगा वाहू लागली. या मोहिमेतून मिळविलेल्या पुरस्कार रकमेचा वापर गावाच्या विकासावर करण्यात आला. त्यामुळे गावातील अनेक समस्यांचा निपटारा झाला. शासनाने ही मोहीम राबविणाऱ्या गावांसाठी निकष ठेवले. या निकषाच्या आधारे खरे उतरण्यासाठी तंटामुक्म समित्यांनी आंतरजातिय विवाहासारखे उपक्रम यशस्विरीत्या राबविले. नव्याने निर्माण होणारे तंटे लोकसहभागातून मिटविण्याची व्यवस्था निर्माण व्हावी आणि सामाजिक शांती प्रस्थापित व्हावी तसेच राज्याची शांततेतून समृद्धिकडे वाटचाल व्हावी यासाठी तंटामुक्ती मोहीम सुरु करण्यात आली. या मोहिमेसाठी २०० गुण ठेवण्यात आले. त्यात १९० किंवा त्यापेक्षा अधिक गुण घेणाऱ्या गावांना विशेष शांतता पुरस्कार देण्यात येते. १५ आॅगस्ट ते ३० आॅगस्ट दरम्यान ग्रामपंचायतीने ग्रामसभा आयोजित करुन तंटामुक्त समितीमध्ये आपला सहभाग निश्चित करायचा असतो. या मोहिमेतील तंटामुक्त गाव समितीने भविष्यात तंटे निर्माण होवू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय योजना करायच्या असतात. गावातील दाखल असलेले दिवाणी महसुली व इतर तंट्याची माहिती ३० सप्टेंबर पर्यंत संकलित करुन, दाखल करुन व नव्याने निर्माण झालेले तंटे लोकसहभागातून मिटविण्याची व्यवस्था करायची असते. या मोहिमेसाठी ३ वह्यांसाठी ८०, १०० व २० असे एकूण २०० गुण ठेवण्यात आले आहे. तंटामुक्त गाव होण्यासाठी प्रतिबंधात्मक योजना, दाखल तंटे मिटविणे व नव्याने निर्माण होणारे तंटे यासाठी अनुक्रमे ५६, ७० व १४ असे किमान गुण घेणे आवश्यक आहे. सदर गुणांची बेरीज १४० येत असली तरी १५० गुण घेतल्याशिवाय गाव तंटामुक्त होत नाही. १९० किंवा त्यापेक्षा गुण घेणाऱ्या गावांना शांतता पुरस्कार देण्यात येतो. त्या गावांना बक्षीस रकमेच्या २५ टक्के अधिकची रक्कम देण्यात येते. सन २०१२-१३ या मोहिमेच्या पाचव्या वर्षात राज्यातील ३ हजार ८६५ गावांनी १ मे २०१३ रोजी ग्रामसभेत आपले गाव तंटामुक्त झाल्याचा स्वयंमुल्यमापन अहवाल सादर केला. जिल्हा स्तरीय मुल्यमापनात २ हजार १३६ गावे पुरस्कारासाठी पात्र ठरली. परंतु बाह्य मुल्य मापनात १ हजार १४७ गावे तंटामुक्त घोषीत करण्यात आली. यापैकी ४७ गावांना शांतता पुरस्कार देण्यात आला. या गावांना ४६ कोटी ५९ लाख ७५ हजार रुपये देण्यात येणार आहे.
पुरस्कारापोटी मिळणार ४६ कोटी ६० लाख
By admin | Published: September 10, 2014 11:48 PM