सहा जनावरांचा मृत्यू : चार दिवसांतील पावसाच्या थैमानाने आठ घरे जमीनदोस्तगोंदिया : शनिवार ते मंगळवार या चार दिवसात जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यातल्या त्यात सालेकसा, देवरी, आमगाव या तालुक्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीने ३७८ घरे आणि १०१ गोठ्यांची पडझड झाली. यात आठ घरे पूर्णत: जमीनदोस्त झाली तर सहा जनावरांना प्राणास मुकावे लागले. प्रशासनाने १५ सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला असून या आठवड्यात चार दिवस आलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यात लाखोंच्या वित्तहानीसह जनावरांची प्राणहानीसुद्धा झाली. जिल्ह्यात आठ घरे भुईसपाट झाली असून ३७८ घरे अंशत: बाधित झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळाली आहे.विशेष म्हणजे नुकसान झालेल्या भागातील सर्वेक्षण अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे नुकसानीचा अंदाज आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे उपलब्ध होऊ शकला आहे. तलाठ्याद्वारे सर्वेक्षण व पंचनामा करून तसा अहवाल तहसीलदारांना पाठविला जातो. यानंतर तहसील कार्यालयातून अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविला जातो. मात्र अनेक तहसीलदारांकडून नुकसानीचा संपूर्ण अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास अद्याप उपलब्ध झालेला नाही. मात्र सर्वच तालुक्यांमध्ये या पावसामुळे कमी-अधिक प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे.या पावसामुळे सहा जनावरांचा मृत्यू झाला. यात दोन शेळ्या, तीन बैल व एका लहान म्हशीचा समावेश आहे. तीन बैलांपैकी आमगाव तालुक्यात पुरामुळे वाहून गेलेल्या बैलबंडीला जुंपलेल्या दोन बैलांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण ३७८ घरांचे अंशत: नुकसान झालेले आहे. आठ घरांचे पूर्णत: नुकसान झाले आहे. त्यातच नुकसान झालेल्या गोठ्यांची संख्या १०१ वर पोहोचली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव तालुक्यात अंशत: घरे बाधित होवून तब्बल एक लाख १५ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. आमगाव तालुक्यात घरे अंशत: बाधित होवून अंदाजे ६९ हजार रूपयांचे नुकसान व एक बैलजोडी वाहून गेल्याने अंदाजे ४० हजार रूपये असे जवळपास एक लाख नऊ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. सडक-अर्जुनी तालुक्यात घरांचे अंशत: नुकसान होवून सहा हजार ५०० रूपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे. सालेकसा, देवरी, अर्जुनी-मोरगाव, तिरोडा इतर तालुक्यात कितीची वित्तहानी झाली याचा अहवाल उपलब्ध होणे बाकीच आहे. (प्रतिनिधी)सरासरीच्या ७९ टक्के पाऊसजिल्ह्यात १ जून ते १४ सप्टेबर २०१६ या कालावधीत ३१५७२.५ मि.मी. पाऊस पडला असून त्याची सरासरी ९५६.७ मि.मी. इतकी आहे. बुधवार दि.१४ सप्टेबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात ५४६.४ मि.मी. इतका पाऊस पडला असून त्याची सरासरी १६.५ मि.मी. इतकी आहे. आजपावेतो जिल्ह्यात ७९ टक्के पाऊस झाला आहे. १४ सप्टेबर रोजी सकाळी ८ वाजतापर्यंत तालुकानिहाय पडलेला पाऊस पुढीलप्रमाणे आहे. त्याची सरासरी कंसात दर्शविण्यात आली आहे. गोंदिया तालुका- २५४ मि.मी. (३६.३), गोरेगाव तालुका- १६.२ मि.मी. (५.४), तिरोडा तालुका- ११३.४ मि.मी. (२२.७), अर्जुनी मोरगाव तालुका- ५५ मि.मी. (११.०), देवरी तालुका- ३७.४ मि.मी. (१२.५), आमगाव तालुका- ४३.४ मि.मी. (१०.८), सालेकसा तालुका- २७ मि.मी. (९.०) आाणि सडक अर्जुनी तालुका- निरंक, असा एकूण ५४५.६ मि.मी. पाऊस पडला असून त्याची सरासरी १६.५ मि.मी. इतकी आहे.
४७९ घरे-गोठ्यांची पडझड
By admin | Published: September 15, 2016 12:15 AM