घरगुती मीटरधारक : पथकाची थकबाकीदारांवर करडी नजर गोंदिया : जिल्हावासीयांवर महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीची तब्बल ४६ कोटी ७६ लाख ५० हजार ९३७ रूपयांची थकबाकी आहे. विशेष म्हणजे महावितरणने मीटरधारकांची वेगवेगळी वर्गवारी करून ठेवली असून त्यात आघाडीवर घरगुती मीटरधारक आहेत. कारण घरगुती मीटरधारकांवर चार कोटींच्या घरात थकबाकी असून त्यानंतर व्यवसायीक वीज मीटरधारकांना नंबर लागत आहे. या सर्व थकबाकीदारांवर वीज वितरण कंपनीच्या पथकाची करडी नजर आहे हे विशेष. अन्न, वस्त्र व निवारा या जीवनातील मुलभूत गरजा असतानाच त्यात आता वीजेचा समावेश होऊ लागला आहे. घरातील प्रकाशापासून ते कित्येकांची रोजीरोजीही याच विजेवरून चालते. मात्र काही मिनीटांसाठी वीज पुरवठा खंडीत होताच ओरडणाऱ्या कित्येकांवर वीज वितरण कंपनीची थकबाकी आहे हे सुद्धा तेवढेच सत्य आहे. आजघडीला जिल्हावासीयांवर वीज वितरण कंपनीची ४६ कोटी ७६ लाख ५० हजार ९३७ रूपयांची थक बाकी आहे. वीज वितरण कंपनीकडून त्यांच्या ग्राहकांची वर्गवारी करण्यात आली आहे. यात घरगुती, औद्योगीक, व्यवसायी व कृषी हे चार वर्ग अतिमहत्वाचे वीज वापर करणारे आहेत. यात घरगुती मीटरधारक आघाडीवर आहेत. कारण त्यांच्यावर चार कोटी ४३ लाख ४१ हजार ३७० रूपयांची थकबाकी आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर व्यवसायी मीटरधारक असून त्यांच्यावर ९० लाख ९५ हजार ७७६ रूपयांची थकबाकी आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर औद्योगीक मीटरधारक असून त्यांच्यावर ७३ लाख ७२ हजार ८५६ रूपयांची थकबाकी आहे. जिल्ह्यावर कोट्यवधींची थकबाकी असल्याने महावितरणच्या हिटलिस्टवर सध्या गोंदिया जिल्हा आहे. त्यामुळे थकबाकीच्या या प्रकारावर आळा घालता यावा यासाठी आता वरिष्ठांकडून वसुली मोहीम राबवून वसुली करण्याचे आदेश दिले जात आहेत. परिणामी वीज वितरण कंपनीकडून सातत्याने वसुली मोहिम राबविली जात असून गरज पडल्यास वीज जोडणी कापण्यापर्यंतची कारवाई सुद्धा केली जात आहे. (शहर प्रतिनिधी)कृषी मीटरधारकांवर ३० कोटी जगाचा पोशींदा असलेल्या शेतकऱ्याचा खेळ पाण्यावर अवलंबून असतो. याकरिताच ज्या शेतकऱ्याकडे सिंचनाची सोय आहे आणि ज्यांच्याकडे नाही अशा दोघांनाही पंपासाठी वीज जोडणीची गरज असते. जिल्ह्यातील अशा कृषी पंपधारकांवर सर्वाधीक ३० कोटी ६४ लाख ८६ हजार ९७८ रूपयांची थकबाकी आहे. विशेष पथकाचे धाडसत्र जेथे अपेक्षेपेक्षा कमी वीज वापर होतो अशा ग्राहकांची यादी तयार करून त्यांची तपासणी करण्याची मोहीम वीज वितरण कंपनीने सुरू केली आहे. विशेष म्हणजे आकडा टाकणारे बहाद्दर दिवसा सोडून रात्रीला आडका घालत आहेत. अशा आकडेबाजांवर कारवाई करण्यासाठी वीज कंपनीचे विशेष पथक धाडसत्र राबवित आहेत. यात हे पथक दिवसा व रात्री कधीही कोणत्याही वेळी आकडाबाजांवर धाड घालणार आहे. अशात जे आकडेबाज हाती लागतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.
जिल्हावासीयांवर ४७ कोटींची थकबाकी
By admin | Published: October 14, 2016 2:10 AM