गोंदिया : कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना प्रत्येकाच्या तोंडावर मास्क असणे आवश्यक असताना मास्क न वापरता रस्त्यावर बिनधास्त फिरणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई नियमितपणे सुरूच आहे. गोंदिया शहर पोलिसांनी १६ ते २५ फेब्रुवारी या सात दिवासात विना मास्क असलेल्या ४७१ जणांवर प्रत्येकी १०० रूपये दंड आकारून ४७ हजार १०० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे.
काही जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत आहे. यामुळे मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग आदी गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग जरी आटोक्यात असला तरी खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे मास्क न लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करुन त्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. गोंदिया शहर पोलिसांनी १६ फेब्रुवारी रोजी १२१ लोकांना दंड करून त्यांच्याकडून १२ हजार १०० रूपये, १७ फेब्रुवारी रोजी ७९ जणांकडून ७ हजार ९०० रूपये, २० फेब्रुवारी रोजी २१ जणांकडून २ हजार १०० रूपये, २२ फेब्रुवारी रोजी १०१ जणांकडून १० हजार १०० रूपये, २३ फेब्रुवारी रोजी ५१ जणांकडून ५ हजार १०० रूपये, २४ फेब्रुवारी रोजी ३१ जणांकडून ३ हजार १०० रूपये तर २५ फेब्रुवारी रोजी ६७ जणांकडून ६ हजार ७०० रूपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष सपाटे, अभिजीत भुजबळ, राजेश हुकरे, साजीद शेख, देवानंद मलगाम, संजय बावणकर, सीमा सूर्यवंशी, मरीयम खान, रिना चव्हाण, पोलीस हवालदार घनश्याम थेर, संतोष भांडारकर, सुरेश चौधरी, अनिल कोरे, राहुल रामटेके, पटले, बन्सोड, सोनवाने यांनी केली आहे.