गोंदिया : मागील आठ दिवसांत तब्बल ४९१ बाधितांची भर पडली असून बाधितांचा ग्राफ सातत्याने वाढत असल्याने कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ६०५ पोहोचली आहे. गुरुवारी (दि.१३) जिल्ह्यात १२० बाधितांच्या संख्येत भर पडल्याने जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक होत असल्याचे चित्र आहे, तर १० बाधितांनी कोरोनावर मात केल्याने थोडा दिलासा मिळाला आहे.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने गुरुवारी १११४ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यात ६८७ नमुन्यांची आरटीपीसीआर, तर ४२७ नमुन्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. यात १२० नमुने कोरोनाबाधित आढळले. त्याचा पाॅझिटिव्हिटी रेट १०.७ टक्के आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून सर्वाधिक ३९४ रुग्ण गोंदिया तालुक्यात आहे. त्यामुळे हा तालुका कोरोनाचा हाॅटस्पॉट झाला आहे. दोन दिवसांत पॉझटिव्हिटी रेट दोन टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे जिल्हावासीयांसाठी ही थोडी चिंताजनक बाब आहे.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ४८२८७३ चाचण्या करण्यात आल्या. यात २५६२७२ नमुन्यांची आरटीपीसीआर, तर २२६६०१ नमुन्याची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात ४१९११ नमुने कोरोनाबाधित आढळले. यापैकी ४०५९१ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. गुरुवारी १० बाधितांनी मात केल्याने कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ६०५ पोहोचली आहे.
गोंदिया झाला कोरोनाचा हाॅटस्पॉट
जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यातच गोंदिया आणि आमगाव तालुक्यांतील बाधितांचा आलेख सातत्याने उंचावत आहे. गोंदिया तालुक्यात सद्य:स्थितीत ३९४ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, तर आमगाव तालुक्यात ७२ रुग्ण आहेत. त्यामुळे गोंदिया तालुका कोरोनाचा हाॅटस्पॉट झाला आहे.
पॉझिटिव्हिटी रेट वाढला
कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने पॉझिटिव्हिटी रेटसुद्धा वाढला आहे. मागील चार दिवसांच्या कालावधीत पॉझिटिव्हिटी रेट १.७९ टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे ही बाब जिल्हावासीयांची थोडी चिंता वाढविणारी आहे.
जिल्हावासीयांनो, करा नियमांचे पालन
कोरोना आणि ओमायक्रॉनला हलक्यात न घेता गांभीर्याने घेण्याची गरज आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याने नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरज आहे. मास्क, सॅनिटायझर वापर तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याची गरज आहे.