गोंदिया : तालुक्यातील चुटीया येथील श्रीराम अभिनव सहकारी संस्थेने शासकीय धान खरेदी केंद्रावर खरीप व रब्बी हंगामात खरेदी केलेल्या एकूण २८ हजार ५९ क्विंटल धानाची अफरातफर करून ५ काेटी ७२ लाख ४० हजार ६२५ रुपयांचा घोळ करून शासनाची फसवणूक केली. याप्रकरणी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी विवेक इंगळे यांच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलिसांनी बुधवारी (दि.९) रात्री या संस्थेच्या ११ संचालकांसह ४ कर्मचारी अशा एकूण १५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
विशेष म्हणजे 'लोकमत'ने सर्वप्रथम हा घोळ उघडकीस आणला होता. जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळ हमीभावाने सहकारी संस्थांच्या माध्यमातून शासकीय धान खरेदी केंद्रावर धान खरेदी करतात. शासकीय धान खरेदी केंद्रावर धान खरेदी करणाऱ्या संस्थांना फेडरेशन प्रति क्विंटल कमिशन देत असते. या संस्थांनी केंद्रावर खरेदी केलेला धान राईस मिलर्ससह करार करून भरडाई करून सीएमआर तांदूळ शासनाकडे जमा केला जातो. मात्र चुटीया येथील श्रीराम अभिनव सहकारी संस्थेने गेल्या खरीप हंगामात खरेदी केलेला १२ हजार ६३ किलो व रब्बी हंगामातील १५ हजार ९९६ क्विंटल असा एकूण २८ हजार ५९ क्विंटल १३ किलो धान एकूण किमत ५ कोटी ७२ लाख ४० हजार ६२५ रुपयांचा धान फेडरेशनकडे जमा केला नाही. शिवाय खरेदी केलेला धान या संस्थेच्या गोदामातसुद्धा शिल्लक नव्हता. त्यामुळे या संस्थेच्या संचालक व कर्मचाऱ्यांनी ५ कोटी ७२ लाख ४० हजार ६२५ रुपयांच्या धानाची अफरातफर करून शासनाची फसवणूक केली. त्यामुळे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी विवेक इंगळे यांच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या संचालक आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल
गुन्हा दाखल करण्यात आलेल्या श्रीराम अभिनव सहकारी संस्थेच्या संचालकांमध्ये मोहन केलराम राणे, लक्ष्मीचंद ताराचंद रहांगडाले, सेवक मोतीराम शेंडे, चिमातन दसाराम तुरकर, छोटेलाल फुलीचंद गौतम, केदारनाथ लोकचंद देशमुख, माधेराव लोकचंद देशमुख, भागचंद आसाराम राणे, उमा प्रल्हाद राणे, अनुबाई राधेलाल वट्टी, गिगमदास फुलीचंद गौतम आदी ११ संचालक व संगणक ऑपरेटर मनीष ओमकार वैष्णव, ग्रेडर दिनेश हेमराज चव्हाण, केंद्र प्रमुख व ग्रेडर खुमेश भुमेश्वर राणे व शिशुपाल भूमेश पटले सर्व रा.चुटीया यांचा समावेश असून यांच्यावर भादंविच्या कलम ४०९, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी करीत आहेत.
घोळ खरिपातही पण तक्रारीस विलंब
तालुक्यातील चुटीया येथील श्रीराम अभिनव सहकारी संस्थेने खरीप हंगामात खरेदी केलेला तब्बल १२ हजार क्विंटल धान सहा महिने लोटूनही जमा केला नाही. यानंतरही या संस्थेला रब्बी हंगामात धान खरेदीची परवानगी देण्यात आली. त्यानंतर या संस्थेने पुन्हा रब्बी हंगामातील १५ हजार ९९६ क्विंटल धान जमा केला नाही. पण यानंतरही या संस्थेवर कारवाई करण्यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला तब्बल दोन महिन्यांचा कालावधी लागला. त्यामुळे या प्रकरणात एवढी दिरंगाई का हे कळण्यास मार्ग नाही.
चूक संस्थेची, शिक्षा मात्र शेतकऱ्यांना
चुटीया येथील श्रीराम अभिनव सहकारी संस्थेच्या धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. या संस्थेने धान जमा न केल्याने फेडरेशनने धानाचे चुकारे थांबविले आहे. त्यामुळे हक्काचे धान विक्री करून शेतकऱ्यांना उधारउसनवारी करून गरज भागविण्याची वेळ आली आहे. त्यामुळे चूक संस्थेची, शिक्षा मात्र शेतकऱ्यांना अशी स्थिती आहे.
पाच संस्थांनी अडविला २० हजार क्विंटल धान
चुटीया येथील संस्थेप्रमाणेच गोरेगाव, तिरोडा तालुक्यातील पाच संस्थांनी अद्यापही २० हजार क्विंटल धान जमा केलेला नाही. या संस्थांनासुध्दा अंतिम नोटीस देण्यात आली आहे. येत्या आठ-दहा दिवसांनंतर या संस्थांवरसुध्दा कारवाई होण्याची शक्यता आहे.