माफियांवर कारवाई : ९२ लाखांचा दंड वसूल गोंदिया : बांधकामासाठी उपयुक्त असलेल्या वाळूचा उपसा करण्यासाठी २०१६-१७ या वर्षात ३६ वाळूघाट लिलावात काढले होते. त्यापैकी १५ वाळूघाटांचा लिलाव झाला. त्यातून शासनाला ५ कोटी ३२ लाख ३५ हजार २८६ रुपयांचा महसूल मिळाला आहे. याशिवाय डिसेंबर २०१६ अखेर महसूल व खनिकर्म विभागाने ९७८ अनिधकृत रेती व इतर गौण खनिज चोरी प्रकरणात कारवाई करून ९२ लाख १८ हजार ११८ रुपये महसूल शासनाला मिळवून दिला आहे. १९ अनिधकृत रेती व इतर गौण खनिज प्रकरणात कारवाई करून गुन्हे नोंदविण्यात आले आहे. २१ वाळूघाटांच्या लिलावाची प्रक्रिया अजूनही सुरु आहे. रेतीचे अनधिकृत उत्खनन व वाहतूक होवू नये यासाठी तालुका पातळीवर भरारी पथके गठीत करण्यात आली असून ही पथके प्रभावीपणे काम करीत असल्याचे जिल्हा खनिकर्म अधिकारी फुलेकर यांनी सांगितले. वाळूप्रकरणी ठेकेदार, लिलावधारक, वाहन मालक-वाहनचालक दोषी आढळल्यास त्यांचेविरूध्द प्रचलित नियमानुसार कारवाई करून गुन्हे दाखल करण्याचे तसेच प्रत्येक तहसीलदाराने प्रत्येक आठवड्यातून किमान दोन अवैध गौण खनिज प्रकरणात गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना दिले आहे. त्यामुळे वाळूचा व इतर गौण खनिजाचा नियमबाह्य उपसा तसेच चोरटी वाहतूक करणाऱ्यांना बराच आळा बसला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
वाळूघाटांच्या लिलावातून मिळाले ५ कोटी ३२ लाख
By admin | Published: February 04, 2017 1:49 AM