गोंदिया : मागील १० महिन्यांपासून अवघ्या जगात हाहाकार माजविणाऱ्या कोरोनाचा अंत आता जवळ आल्याचे दिसत असतानाच जिल्ह्यातही दिलासादायक स्थिती दिसून येत आहे. जिल्ह्यातील ५ तालुक्यांत १० च्या आत क्रियाशील रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे. म्हणजेच, हे तालुके ‘कोरोनामुक्ती’च्या वाटेवर दिसून येत आहेत. तर दुसरीकडे जिल्ह्यात आता बुधवारपर्यंत (दि. २०) क्रियाशील १६१ रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे. यावरून आता जिल्ह्यात कोरोना हरणार असल्याचे संकेत येत आहेत.
देशात मार्च महिन्यात कोरोनाने आपले डोके वर काढले व त्यानंतर हळूहळू अवघ्या देशालाच आपल्या कवेत घेऊन हेलावून सोडले. आजही देशातील कित्येक भागांत कोरोनाचा उद्रेक सुरूच असून बाधित व मृतांची आकडेवारी सातत्याने वाढत चालली आहे. मात्र सुदैवाची बाब अशी की, गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा परतीचा प्रवास दिसून येत असून बाधितांची संख्या घटत चालल्याने जिल्ह्यातील कोरोनाचा प्रकोप नियंत्रणात आल्याचे दिसत आहे. दिवाळी साजरी केल्यानंतर जिल्ह्यात कोरोना हळूहळू कमी होत गेला व जिल्हावासीयांना तेव्हापासूनच दिलासा मिळाला आहे.
बुधवारपर्यंत (दि. २०) जिल्ह्यात बाधितांची संख्या १४,०६६ वर गेली असतानाच १३,७२४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची नोंदही घेण्यात आली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर ९६.८५ टक्के नोंदविण्यात आला असून ही नक्कीच दिलासादायक बाब आहे. यामुळेच आता जिल्ह्यात फक्त १६१ क्रियाशील रुग्ण उपचार घेत आहेत. तर ५ तालुक्यांतील रुग्ण संख्या १० च्या आत दिसून येत आहे. यामध्ये गोरेगाव तालुक्यात ६, देवरी तालुक्यात ५, सडक-अर्जुनी तालुक्यात २ तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यात १ क्रियाशील रुग्णाची नोंद घेण्यात आली आहे. यावरून आता हे तालुके लवकरच कोरोनामुक्त होणार असतानाच जिल्ह्यातही कोरोना हरणार असे संकेत दिसून येत आहेत.
---------------------------------
गोंदिया तालुका हॉटस्पॉट
कोरोनाचा जिल्ह्यातील पहिला रुग्ण हा गोंदिया शहरात आढळून आला होता व त्यानंतर सातत्याने गोंदिया शहर व तालुका हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. आजही तालुक्यातील रुग्ण संख्या सर्वाधिक असून हेच कारण आहे की, क्रियाशील रुग्ण संख्याही गोंदिया तालुक्यात ८९ नोंदविण्यात आली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर आमगाव तालुका असून, या तालुक्यात २३ क्रियाशील रुग्ण आहेत.