गोंदिया: आपल्या भावाला बोलावण्यासाठी गेलेल्या ७ वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्या नराधमाला विशेष सत्र न्यायालयाने ५ वर्षाचा सश्रम कारावास व ३ हजार रूपये दंड ठोठावला आहे. ही सुनावणी ११ डिसेंबर रोजी करण्यात आली. ही सुनावणी तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ व विशेष सत्र न्यायाधीश एन.बी. लवटे यांनी केली आहे. अशोक नंदेश्वर (४०) रा. आमगाव असे आरोपीचे नाव आहे.
आरोपीने ८ ऑक्टोबर २०१९ ला दुपारी २ वाजताच्या सुमारास पिडीतेला तिच्या आईने भावाला बोलावण्यासाठी पाठविले होते. ७ वर्षाची मुलगी ही बोलाविण्यास गेली असता आरोपीने तिच्याशी अश्लील चाळे केले. पिडितेने आपल्या आईला सांगितल्यावर तिच्या आईने आरोपी विरोधात आमगाव पोलिसात तक्रा केली. आमगाव पोलिसानी गुन्हा दाखल करून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय सिंह यांनी केला. या प्रकरणात आरोपीविरूध्द दोष सिध्द करण्यासाठी पिडित पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता वसंतकुमार चुटे यांनी एकुण ५ साक्षदारांची साक्ष न्यायालयासामोर नोंदविली. आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी म्हणून पिडितेतर्फे युक्तीवाद केला. आरोपीचे वकील व सरकारी वकील यांच्या सविस्तर युक्तीवादानंतर तदर्थ जिल्हा न्यायाधीश -१ व विशेष सत्र न्यायाधीश एन.बी. लवटे यांनी आरोपीविरूध्द सरकारी पक्षाचा पुरावा व सरकारी वकीलांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून आरोपी अशोक नंदेश्वर (४०) ता. जि. गोंदिया याला शिक्षा सुनावली. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस शिपाई गजानन चौधरी यांनी केले. अशी सुनावली शिक्षा
बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८ अन्वये ३ वर्षाचा सश्रम कारावास व १ हजार रूपये दंड व व दंड न भरल्यास ३ महिन्याचा अतिरिक्त कारावास, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम १० अन्वये ५ वर्षाचा सश्रम कारावास व १ हजार रूपये दंड व दंड न भरल्यास ३ महिन्याचा अतिरिक्त कारावास, भादंविचे कलम ३५४ प्रमाणे ३ वर्षाचा सश्रम कारावास व १ हजार रूपये दंड व दंड न भरल्यास ३ महिन्याचा अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली.