विजय मानकर लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : मागील २ वर्षांपासून सालेकसा तालुक्यात धान खरेदीबाबत गैरव्यवहार होताना उघड झाले असता त्या गैरव्यवहारावर सतत अंथरुन पांघरुन टाकण्याचे काम खरेदी करणाऱ्या सदस्यांनी केले. एवढेच नाही तर रद्द झालेला परवाना पुन्हा बहाल करण्यात यशस्वी होवून पुन्हा धान खरेदी सुरु झाली. परंतु यंदा या तालुक्यात व्यापाऱ्यांनी लाखो व करोडो रुपये कमविण्याचा नवीन फंडा सुरु केला असून गावागावांतील अनेक व्यापाऱ्यांनी जवळपास ५० हजार क्विंटल धान युपी आणि एमपी राज्यातून बोलावला आहे. तो धान येथील धान खरेदी केंद्रावर विक्री करण्याचे दावपेच खेळू लागले आहेत. यासाठी गावातील शेतकऱ्यांचे सातबारा संकलन करण्याची मोहीम चालविली आहे. यामुळे तालुक्यातील खरा धान विक्री करणारा शेतकरी आपला धान विक्री करण्यापासून वंचित राहू शकतो.सालेकसा तालुका हा मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्याच्या सिमेवर असून सीमेलगत अनेक गावांमध्ये धान व्यापारी आपले बस्तान मांडून बसले आहेत. काही व्यापाऱ्यांनी आपल्या घरा लगत किंवा दुकानालगत धान संग्रहीत करुन ठेवण्यासाठी गोडाऊन सुद्धा तयार करुन ठेवले आहेत. धानाचे पीक निघताच हे व्यापारी शेतकऱ्यांकडील धान खरेदी करुन घेतात. काही व्यापारी तर पीक निघण्यापूर्वीच काही शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम देवून ठेवतात. धानाची मळनी होताच शेतकऱ्यांच्या खड्यावरुनच त्याच्या धानाची उचल करुन घेतात. त्यानंतर व्यापाऱ्यांची नजर त्याच्या सातबाऱ्यावर असते. शेतकऱ्याला बोनसच्या रकमेचे लालच देवून सातबारा हस्तगत करतात. अशात शेतकरी आपला सातबारा सहज त्या व्यापाऱ्याला देवून टाकतो. हा प्रकार दरवर्षी छळणारा झाला आहे.यंदा जिल्ह्यात धानाचे उत्पादन रोगामुळे निम्यावर आलेले आहे. अशात बाहेरुन धान आणून विक्री करुन भरघोष मुनाफा प्राप्त करण्याचा डाव या व्यापाऱ्यांनी खेळला आहे. उत्तरप्रदेश राज्यात धानाला फार कमी भाव मिळत असल्याचे व्यापाऱ्यांना माहिती होताच त्यांनी त्यापेक्षा जास्त भाव देवून तेथील धान खरेदी केला आहे. असे माहिती झाले की, येथील व्यापाऱ्यांनी युपी मधून येणारा धान १४०० ते १४५० रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे धान खरेदी केला आहे. तोच धान येथील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर १८६८ रुपये प्रति क्वींटल प्रमाणे विक्री होत आहे. त्यावर राज्य शासनाकडून ७०० रुपये प्रतिक्विंटल २५६८ रुपये प्रमाणे धानाला भाव मिळेल. परंतु प्रत्यक्षात येथील छोट्या शेतकऱ्यांकडे हमी भावात विक्रीसाठी धान उरलाच नाही. याच थेट लाभ घेण्यासाठी युपीचा धान खरेदी करीत आहे. यापासून व्यापाऱ्यांना १२०० रुपये प्रति क्विंटलच्या जवळपास नफा मिळणार आहे. यासाठी त्याला हवा आहे गावातील शेतकऱ्यांचा सातबारा. काही व्यापाऱ्यांनी तर सातबारा उतारा घेण्यासाठी शेतकऱ्यांची यादी तलाठ्यांकडे किंवा कोतवालाकडे देवून ठेवली आहे. अशावेळी तलाठी त्यांना थेट सातबारा देतील की प्रत्यक्ष संबंधीत शेतकऱ्यांच्या हातात देतील याबद्दल तलाठ्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. व्यापारी वर्ग सतत सातबारा संकलन करण्यासाठी धावपळ करीत असताना दिसत आहे. या कामात मात्र व्यापाऱ्यांना यश लाभत आहे. कारण की दर ५० क्विंटल मागे जवळपास ३५००० रुपये बोनस मिळणार असून अर्धे बोनस शेतकऱ्यांना देण्याचे आश्वासन सातबारा देणाऱ्या व्यापाऱ्याला देत आहे.
आणेवारीला फरक पडणारयंदा धानाचे उत्पादन जवळपास निम्यावर असून धान खरेदीची मर्यादा सुद्धा प्रती एकर १३ क्विंटल करण्यात आली आहे. परंतु परराज्यातून धान आणून येथील धान खरेदी केंद्रावर विकल्यास धान विक्री दुप्पट दिसणार आहे. अशात शेतकऱ्यांची मदत मिळावी म्हणून चालणारी ओरड कोण ऐकणार? त्यामुळे शेतकऱ्यांनी सातबारा देताना अवश्य विचार करावा.
उत्तर प्रदेशातून धान विक्रीला आल्याबाबत व येथील धान खरेदी केंद्रावर विक्री होण्याबाबत कोणतीच तक्रार आपल्याकडे आलेली नाही. तक्रार आल्यास प्रकरणाची चौकशी करुन योग्य कारवाई अवश्य केली जाईल.- विश्वास सिरसाटउपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार सालेकसा