नरेश रहिले । लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : जातीयवादाला थारा न देता सर्वधर्म समभावाची संकल्पना साकारण्यासाठी शासनाने समाज कल्याण विभागामार्फत आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना अमंलात आणली. गोंदिया जिल्ह्यातही आंतरजातीय विवाहाचे प्रमाण वाढत आहेत. मागील सात वर्षात गोंदिया जिल्ह्यात एजारोच्या घरात आंतरजातीय विवाह झाले. यापैकी ५२१ जोडप्यांना आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ देण्यात आला. अस्पृश्य निवारण्यासाठी आंतरजातीय योजना अमंलात आणली. आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना अनुदान देण्याचे काम शासन १९५८ पासून करीत आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या व्यक्तींपैकी एक व्यक्ती व दुसरा व्यक्ती दुसरा म्हणजेच सुवर्ण, हिंदू लिंगायत असल्यास आंतरजातीय मानण्यात येते. शासनाने सदर योजनेंतर्गत ३० जानेवारी १९९८ पासून १ हजार रूपये प्रोत्साहन राशी देण्यात येत होती. परंतु १ फेब्रुवारी २०१० पासून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना ५० हजार रूपये प्रोत्साहन राशी देण्यात येते. गोंदिया जिल्ह्यात सन २०१०-११ पूर्वी आंतरजातीय विवाहासंदर्भात उदासिनता होती. मात्र हळूहळू आता या आंतरजातीय विवाहाकडे तरूण वळत आहेत. सन २०१०-११ या वर्षात ३२, सन २०११-१२ या वर्षात २५, सन २०१२-१३ या वर्षात १४२, सन २०१३-१४ या वर्षात ६७, सन २०१४-१५ या वर्षात १०४, सन २०१५-१६ या वर्षात ७५, सन २०१६-१७ या वर्षात ७६ अशी ५२१ जोडप्यांना आंतरजातीय विवाह केल्यामुळे शासनाचा लाभ देण्यात आला. सन २०१२-१३ या वर्षात सर्वात १४२ जोडप्यांना लाभ देण्यात आला. या वर्षात सर्वात जास्त लाभ देण्यात आल्याची आकडेवारी दिसत असली तरी त्या वर्षाच्या दोन वर्षापूर्वीच्या जोडप्यांना लाभ न दिल्यामुळे त्या वर्षात त्याही जोडप्यांना लाभ देण्यात आला होता. जातीयवादाला बगल देत तरूणमंडळी प्रेम प्रकरणातून या आंतरजातीय विवाहाकडे वळत आहेत. तंमुसने लग्न लावलेल्या जोडप्यांना अनुदान जिल्ह्यात एकूण १७० आंतरजातीय तर ९२ प्रेमविवाह महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांनी घडवून आणले. या विवाहाला सुरूवातीला मुलगा व मुलगी यांच्या नातेवाईकांचा तीव्र विरोध असायचा. मात्र तंटामुक्त समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे समुपदेशन केले. कुठे आई-वडिलांच्या संमतीने तर कुठे त्यांच्या विरोधाला न जुमानता सज्ञान प्रेमी युगलांचे आंतरजातीय व प्रेमविवाह लावून दिले. तंमुसने लावलेले अनेक आंतरजातीय विवाहाचे जोडपे समाज कल्याण विभागाच्या अनुदानापासून वंचीत आहेत. त्यासाठी त्यांनी स्वत: अर्ज केले नाही किंवा तंटामुक्त समितीनेही पुढाकार घेतला नाही. महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने गावातील तंटे गावातच सामोपचाराने सोडविण्याबरोबर जातीय सलोखा कायम राखणे, अंधश्रध्दा निर्मुलन करणे, स्त्री भू्रणहत्येवर आळा घालणे, महिला सक्षमीकरणासाठी कार्य करणे, वृक्षारोपण करणे व गावाच्या विकासासाठी सण, उत्सव, मेळावे पोलीस बंदोबस्ताशिवाय शांततेत पार पाडणे, महापुरूषांच्या जयंत्या, पुण्यतिथी शांततेत पार पाडण्याबरोबर जातीय बंधनांना झुगारून गावात आंतरजातीय विवाहाचा पायंडा तंटामुक्त समित्यांनी घातला. प्रोत्साहनपर जोडप्यांना दिले २ कोटी ४७ लाख आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहन राशी देण्यात येते. सन २०१०-११ या वर्षात ३२ जोडप्यांना ४ लाख ८० हजार, सन २०११-१२ या वर्षात २५ जोडप्यांना १२ लाख ४५ हजार, सन २०१२-१३ या वर्षात १४२ जोडप्यांना ६९ लाख ५५ हजार, सन २०१३-१४ या वर्षात ६७ जोडप्यांना ३२ लाख ८० हजार, सन २०१४-१५ या वर्षात १०४ जोडप्यांना ५१ लाख ९५ हजार, सन २०१५-१६ या वर्षात ७५ जोडप्यांना ३७ लाख ५० हजार, सन २०१६-१७ या वर्षात ७६ जोडप्यांना ३८ लाख रूपये देण्यात आले.
सात वर्षांत ५२१ ‘इंटरकास्ट मॅरेज’
By admin | Published: May 07, 2017 12:12 AM