सडक-अर्जुनी : डुग्गीपार पोलिसांनी दि. २२ रोजी देवरी पोलिसांकडून मिळालेल्या सूचनेवरून गांजा असलेल्या स्कॉर्पिओला सायंकाळी ७.२० वाजता पकडले. त्या गाडीसह दोन व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ५३ किलो ३८६ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. गाडीसह त्या गांजाची किंमत मिळून १२ लाख ५३ हजार ६०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. देवरीवरून येत असलेली स्कॉर्पिओ आणि त्या स्कॉर्पिओमध्ये गांजा असल्याची माहिती डुग्गीपार पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजकुमार केंद्रे यांना मिळाली. त्यांनी डुग्गीपार पोलीस स्टेशनचे सपोनि गणपत तुमडा आणि पोलीस उपनिरीक्षक रोहित चौधरी यांच्यासह कोहमारा टोली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर बॅरिकेट लावून नाकेबंदी केली. सायंकाळी ७.२० वाजता राखाडी रंगाची स्कॉर्पिओ देवरीवरून येत असताना तिला पकडण्यात आले. त्या वाहनासह एक चालक आणि दुसरा इसम यांना दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन गाडीची चौकशी केली असता गाडीमध्ये ओलसर नरम असलेला गांजा (अंमली पदार्थ) ५३ किलो ३८६ ग्रॅम (किंमत ७ लाख ५० हजार रुपये), स्कारपिओ गाडी जेएच १०/बी-३१९३ किंमत ५ लाख रुपये जप्त करण्यात आले. दोन्ही आरोपींच्या झडतीत २ मोबाईल हँडसेट, रोख १ हजार ६०० रु. असा एकूण १२ लाख ५३ हजार ६०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. आरोपी रामानंद नागेश्वर चौधरी उर्फ यादव (४८) रा. तुरकाहा पोलीस स्टेशन गोपालगंज (बिहार) तर दुसरा आरोपी मुकेशकुमार रविंद्र माझी (२०) रा. एकदेखा (बिहार) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. अधिक तपास सहपोलीस निरीक्षक गणपत तुमडा आणि रोहीत चौधरी करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)
‘त्या’ स्कॉपिओ गाडीत ५३ किलो ३८६ ग्रॅम गांजा
By admin | Published: November 24, 2015 2:05 AM