नवेगावबांध : येथील ग्रामीण रुग्णालयात ४ ते ७ तारखेदरम्यान रोग निदान व शस्त्रक्रिया शिबिर पार पडले. शिबिरात ५३६ रुग्णांनी आरोग्य तपासणी शस्त्रक्रिया करवून घेत शिबिराचा लाभ घेतला.
उद्घाटन सरपंच अनिरुद्ध शहारे यांच्या अध्यक्षतेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरीश मोहबे यांच्या हस्ते आरोग्य देवता धन्वंतरीच्या छायाचित्राचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच तथा रुग्ण कल्याण समितीचे सदस्य रघुनाथ लांजेवार, सतीश कोसरकर, विलास कापगते, बाबूलाल नेवारे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक घुमनखेडे, डॉ. नेहा मदने, डॉ. रुपेश कापगते, डॉ. महेश लोथे, डॉ. श्याम भोयर, डाॅ. लोकेश वाढिवा, डॉ. कुकडे, डॉ. गायत्री गायकवाड उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. मोहबे यांनी, ज्यांचे आरोग्य चांगले तोच जिवंत माणूस असतो. सुदृढ व्यक्ती सदैव सकारात्मक असतात व त्यांच्यामुळे देशाला चांगले नागरिक मिळून देशाचा विकास होतो, असे मत व्यक्त केले. शहारे यांनी ग्रामीण रुग्णालयातील सर्व डॉक्टरांनी कोरोना काळात उत्तम सेवा दिली असे सांगत त्यांचे कौतुक केले. शिबिराच्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्रातील रुग्णांच्या अपेक्षा पूर्ण होतील असा विश्वास व्यक्त केला, तर लांजेवार यांनी, ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी केली. प्रास्ताविकातून डॉ. धुमनखेडे यांनी, ग्रामीण क्षेत्रातील शेवटच्या रुग्णापर्यंत रुग्ण सेवा पोहोचावी या उद्देशातून मागील चार वर्षांपासून शिबिराचे आयोजन सुरू करण्यात आले असल्याची माहिती दिली. संजय रेवतकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. लोथे यांनी आभार मानले. शिबिरासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर व गोंदिया येथील तज्ज्ञ डॉक्टर, तसेच ग्रामीण रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
-------------------------
रूग्णांनी असा घेतला शिबिराचा लाभ
४ ते ७ मार्च दरम्यान ग्रामीण रुग्णालयात घेण्यात आलेल्या या शिबिरात हायड्रोसिल व हर्नियाची ६५ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. ८६ रुग्णांची दंत तपासणी व उपचार, तसेच १२ रुग्णांच्या शरीरावरील लहान गाठींची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याचप्रकारे ३६ रुग्णांची सोनोग्राफी करण्यात आली. यासह अन्य रुग्णांनी आपली आरोग्य तपासणी उपचार करवून घेतला.