लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रब्बी हंगामातील धान खरेदीच्या मर्यादेचा तिढा अद्यापही सुटला नसल्याने खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. आतापर्यंत केवळ २७ धान खरेदी केंद्र सुरु झाले असून १२४७ शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली आहे. तर अजूनही ५७ हजार शेतकरी धानाच्या विक्री करण्यासाठी प्रतीक्षेत आहे. जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळांतर्गत धान खरेदी केली जाते. रब्बीतील धान खरेदीसाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने यंदा १०७ धान खरेदी केंद्रांना मंजुरी दिली आहे. रब्बीतील धान विक्रीसाठी जिल्ह्यातील ६८२८० शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. मात्र रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी यंदा प्रथमच केंद्र शासनाने ४ लाख ७९ हजार क्विंटलची मर्यादा ठरवून दिल्याने धान खरेदीची प्रक्रिया संकटात आली आहे. त्यामुळेच आतापर्यंत १०७ पैकी केवळ २७ धान खरेदी सुरु झाले असून या केंद्रावरुन ५७ हजार क्विंटल धान खरेदी झाली आहे. तर ८० धान खरेदी संस्थानी अद्यापही केंद्र सुरु केलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली असून गरजेपोटी त्यांना खासगी व्यापाऱ्यांना कमी दराने धान विक्री करावा लागत आहे.
मागील वर्षी २८ मे पर्यंत १३ लाख क्विंटल धान n मागील वर्षी रब्बी हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने एकूण २३ लाख क्विंटल धान खरेदी केली होती. तर २७ मे पर्यंत १३ लाख क्विंटल धान खरेदी झाली होती. तर यंदा फारच बिकट स्थिती असून आतापर्यंत केवळ ५८ हजार क्विंटल धान खरेदी झाली आहे. त्यामुळे लाखो क्विंटल धान शेतकऱ्यांच्या घरात पडला असल्याचे चित्र आहे.
उन्हाळ्यातील धान पावसाळ्यात विकायचा का ?- रब्बी हंगामातील धान खरेदीच्या मर्यादेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. त्यामुळे धान खरेदीच्या प्रक्रियेला अद्यापही वेग आलेला नाही. तर खरीप हंगामाला सुरुवात झाली असून खते, बी-बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. पण रब्बीतील धान खरेदी सुरु न झाल्याने घरात तसाच पडला आहे. तर पावसाळ्याला सुरुवात होत असल्याने उन्हाळ्यातील धान पावसाळ्यात विकायचा का असा प्रश्न शेतकऱ्यांनी केला आहे.
३० लाख क्विंटल उत्पादन - यंदा रब्बी हंगामात धानाचे विक्रमी उत्पादन झाले असून हेक्टरी ४३ क्विंटल धानाचे उत्पादन झाल्याचे अंदाजीत आकडेवारी कृषी विभागाने काढली आहे. रब्बीत ६८ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली होती. त्यातून जवळपास ३० लाख क्विंटल धानाचे उत्पादन झाले आहे. तर केंद्र सरकारने केवळ ४ लाख ७९ हजार क्विंटल धान खरेदीला मंजुरी दिली असल्याने २५ लाख क्विंटल धान विकायचा कुठे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.
खरीप हंगाम तोंडावर आहे, खते, बियाणे यांची जुळवाजुळव करण्यासाठी पैशाची गरज आहे, पण रब्बीतील धानाची विक्री न झाल्याने कर्जासाठी सावकाराच्या दारात उभे राहण्याची वेळ आली आहे.- मेघशाम पटले, शेतकरी
मी रब्बी पाच एकरवर धानाची लागवड केली होती. या धानाची विक्री करुन खरिपाच्या तयारीला लागणार होतो. पण रब्बीतील धान घरात तसाच पडून असल्याने हंगाम करायचा कसा असा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे.- विलास दमाहे, शेतकरी
केंद्र सरकारने आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता धान खरेदीची मर्यादा वाढवून देत त्वरित धान खरेदी सुरु करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन उभारु.- राजेंद्र जैन, माजी आमदार
रब्बीतील धान खरेदीवर शासनाने त्वरित तोडगा काढून धान खरेदीची समस्या मार्गी लावून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. - विनोद अग्रवाल, आमदार