लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : देशात कोरोनाची तिसरी लाट ओसरली आहे; मात्र चीन आणि साऊथ कोरिया या देशात कोरोनाचा उद्रेक वाढल्यानंतर देशात चौथ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. अशात १२-१४ वयोगटातील मुलांच्या संरक्षणाच्या दृष्टीने १९ मार्चपासून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार, जिल्ह्यातही लसीकरण सुरू झाले असून, आतापर्यंत २५,९९४ मुलांचे लसीकरण झाले असून, त्याची ५८.८६ एवढी टक्केवारी आहे. कोरोनाला मात देण्यासाठी देशात १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरणाला सुरुवात झाली. यामध्ये ४५ वर्षे वयोगट पुढे लसीकरणाला परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर १८ वर्षे पुढे वयोगटाला परवानगी देण्यात आली व १५ वर्षे वयोगटाचेही नुकतेच लसीकरण सुरू झाले आहे. एवढ्यातच तिसरी लाट आली व आता तिसरी लाट ओसरली असून, परिस्थिती नियंत्रणात आली आहे; मात्र कोरोनाला मात देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरूच असून, नवनवीन लसींना परवानगी दिली जात आहे. सध्या १५ वर्षे पुढे गटाचे लसीकरण सुरू असले तरी त्या खालील मुलांचे लसीकरण झालेले नाही. अशातच आता चीन व साऊथ कोरिया या देशांमध्ये कोरोना उद्रेक परत वाढला असून, अशात भारतात चौथ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. यातूनच आता १२-१४ वयोगटाच्या लसीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर जिल्ह्यात आतापर्यंत २५,९९४ मुलांचे लसीकरण करण्यात आले असून, त्याची ५८.८६ एवढी टक्केवारी आहे.
४९,१०० मुलांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट - जिल्ह्यात ९०९ शाळांमधील १२-१४ वयोगटातील अपेक्षित लाभार्थी शहरी भागात ७,२०० तर ग्रामीण भागात ४१,९०० असे एकूण ४९,१०० आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण संबंधित शाळांमध्ये केले जात आहे. याचबरोबर जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्येही लस उपलब्ध करवून देण्यात आली आहे.
ही मुले आहेत लसीकरणासाठी पात्र - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी असली तरी चौथ्या लाटेपासून लहान मुलांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. म्हणून ज्या मुलांचा जन्म १ जानेवारी २००८ ते १५ मार्च २०१० या कालावधीत झाला आहे, अशी सर्व मुले या लसीकरणासाठी पात्र आहेत. यामुळे पालकांनी याकडे लक्ष देत त्यांच्या मुलांचे लसीकरण करवून घेणे गरजेचे आहे.