गोंदिया : मध्यंतरी कोरोना नियंत्रणात असल्याने कोविड केअर सेंटर बंद करून लक्षण नसलेल्या बाधितांना घरीच विलगीकरण करण्यात येत होते. मात्र आता कोरोनाचा कहर वाढतच चालला असून जिल्ह्यातही बाधितांची संख्या सातत्याने वाढत चालली आहे. अशात घरी विलगीकरणात असलेल्या बाधितांकडून अन्य कुणाला धोका उद्भवू नये यासाठी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये पुन्हा कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. सोमवारपासून (दि. २२) हे सेंटर सुरू करण्यात आले असून तेथे ६ रूग्णांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
मागील वर्षाच्या शेवटी अवघ्या देशातच कोरोना नियंत्रणात आला होता व झपाट्याने रूग्ण संख्या कमी झाली होती. अशात शासनाने मोठ्या प्रमाणात सुरू केलेले कोविड केअर सेंटर बंद केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले होते. जिल्ह्यात विलगीकरणात असलेल्या रूग्णांसाठी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये कोविड केअर सेंटर महत्त्वाचे ठरले होते. मोठ्या संख्येत येथे रूग्णांची सोय करण्यात आली होती. मात्र रूग्ण संख्या घटल्याने जिल्हा प्रशासनाने हे सेंटर बंद केले होते. आता परत कोरोना आपले पाय पसरत असून बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आजघडीला जिल्ह्यात ५३० क्रियाशील रूग्ण असून यातील ४०५ रूग्ण घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले आहेत. मात्र प्रत्येकाच्याच घरी विलगीकरणात राहण्याची व्यवस्था नसते. अशात त्यांच्यापासून अन्य कुटुंबातील व्यक्ती किंवा अन्य कुणालाही कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हीच बाब हेरून आरोग्य विभागाने पॉलिटेक्निक कॉलेजचे अधिग्रहण करून पुन्हा तेथे कोविड केअर सेंटर सुरू केले आहे.
------------------------------
११० बेड्सची व्यवस्था
पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये सुरू करण्यात आलेल्या या कोविड केअर सेंटरमध्ये ११० बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. सोमवारपासून (दि. २२) हे सेंटर सुरू करण्यात आले असून मंगळवारी तेथे ६ रूग्ण होते अशी माहिती होती. एकंदर हे सेंटर सुरू झाल्याने नक्कीच बाधितांना सोयीचे ठरत आहे. शिवाय, त्यांच्यापासून कुणाला कोरोनाची लागण होण्याचा धोकाही आता राहणार नाही.