गोंदिया : एका चार वर्षीय बालिकेच्या अन्ननलिकेत सहा स्टोन अडकले असल्याचे समोर आले होते. त्यामुळे बालिकेचा जीव धोक्यात आला. दरम्यान, येथील बीजे हॉस्पिटलमध्ये डॉ. विकास जैन यांनी बालिकेच्या अन्न शस्त्रक्रिया करून सहा स्टोन काढले. त्यामुळे या चार वर्षीय बालिकेला नवीन जीवन मिळाले असून तिच्या कुटुंबियांनी डॉक्टरांचे आभार मानले. मात्र, हे खडे बाहेर निघताच सर्वांनाच मोठा धक्का बसला.
प्राप्त माहितीनुसार, सालेकसा तालुक्यातील कोटजंभुराजवळील लटोरी येथील एका गरीब आदिवासी कुटुंबातील चारवर्षीय बालिका पोटदुखीच्या आजाराने त्रस्त होती. या बालिकेच्या उपचारासाठी तिच्या कुटुंबियांनी दूरपर्यंत डॉक्टरांकडे पायपीट केली. तिच्यावर गावठी उपचारही केले; पण तिचा पोटदुखीचा त्रास दूर होत नव्हता. दरम्यान, तिच्या कुटुंबियांनी गोंदिया येथील डॉ. विनोद मोहबे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी या बालिकेला डॉ. अशूमन चव्हाण यांच्याकडे घेऊन जाण्याचा सल्ला दिला.
डॉ. अशूमन चव्हाण यांनी बालिकेची आरोग्य तपासणी करून तिचे एक्स- रे काढण्यास सांगितले. एक्स- रे रिपोर्टमध्ये या बालिकेच्या अन्ननलिकेत स्टोन असल्याचे आढळले. यानंतर त्यांनी यासंदर्भात डाॅ. विकास जैन यांच्याशी संपर्क साधून यावर चर्चा केली. यानंतर या बालिकेला बीजे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे सीटीस्कॅन करण्यात आले. त्यात अन्ननलिकेत स्टोन असल्याचे सिद्ध झाले.
चार वर्षीय बालिकेच्या अन्ननलिकेवर शस्त्रक्रिया करून स्टोन काढण्याची शस्त्रक्रिया ही अत्यंत गुंतागुंतीची होती. मात्र, डॉ. विकास जैन यांनी हे आव्हान स्विकारत दुर्बीणद्वारे बालिकेच्या अन्ननलिकेवर शस्त्रक्रिया करून सहा स्टोन सुरक्षितपणे काढण्यात आले. यामुळे बालिकेला नवजीवन मिळाले असून ती आता पूर्णपणे स्वस्थ आहे. या शस्त्रक्रियेसाठी डॉ. नितीन कोतवाल, डॉ. लता जैन व बीजे हॉस्पिटलच्या चमूने सहकार्य केले.