नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बेरोजगारीवर मात करण्यासाठी शासनाने मागेल त्याला काम म्हणून मनरेगाची कामे सुरु करण्याचे स्वप्न दाखविले. केंद्र व राज्य शासनाने गोंदिया जिल्ह्याला सन २०१९-२० या आर्थिक वर्षात एक कोटी मनुष्य दिवस काम देण्याचे ठरविले होते. परंतु सात महिन्यांचा काळ लोटूनही ५० टक्के मनुष्यदिवस काम जिल्ह्याला मिळाले नाही. ६० लाख मनुष्य दिवस काम अवघ्या ५ महिन्यांत मिळेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.गोंदिया जिल्हा आदिवासी व नक्षलदृष्ट्या अति संवेदनशील असल्यामुळे या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी मनरेगाची कामे मोठ्या प्रमाणात करणे अपेक्षीत आहे. परंतु जिल्हा प्रशासनाचे मनरेगाच्या कामांकडे सपशेल दुर्लक्ष असल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील लोकांमध्ये बेरोजगारी वाढत आहे. १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या आर्थिक वर्षात गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना एक कोटी मनुष्य दिवस काम देणे अपेक्षीत होते. परंतु एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांच्या काळात ३९ लाख ८२ हजार २८५ मनुष्य दिवसच काम देण्यात आले.त्यात आमगाव तालुक्यात दोन लाख ५९ हजार ५८७ मनुष्य दिवस, अर्जुनी-मोरगाव तालुक्यात तीन लाख १५ हजार ४२१ मनुष्य दिवस, देवरी तालुक्यात पाच लाख आठ हजार २२५ मनुष्य दिवस, गोंदिया तालुक्यात सहा लाख ८२ हजार ६४२ मनुष्य दिवस, गोरेगाव तालुक्यात तीन लाख १२ हजार ८६२ मनुष्य दिवस, सडक-अर्जुनी तालुक्यात तीन लाख ४५ हजार ६९३ मनुष्य दिवस, सालेकसा तालुक्यात पाच लाख ४० हजार १०५ मनुष्य दिवस, तिरोडा तालुक्यात १० लाख १७ हजार ७५० मनुष्य दिवस अशाप्रकारे एकूण ३९ लाख ८२ हजार २८५ मनुष्य दिवस काम करण्यात आले. उर्वरित ६० लाखंपेक्षा अधिक मनुष्य दिवस कामे जिल्ह्यातील नागरिकांना मिळणार का? असा सवाल केला जात आहे.५७२८ कुटुंबांना १०० दिवस काममागेल त्याला १०० दिवस काम देण्याची तरतूद असल्याचा गाजावाजा केंद्र सरकारने केला. त्यात गोंदिया जिल्ह्याची परिस्थिती पाहता आतापर्यंत पाच हजार ८२७ कुटुंबांना १०० दिवस काम देण्यात आले. त्यात आमगाव तालुक्यातील ३८१, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २३२, देवरी तालुक्यातील ४५७, गोंदिया तालुक्यातील ९७१, गोरेगाव तालुक्यातील ५८१, सडक-अर्जुनी तालुक्यातील ३९५, सालेकसा तालुक्यातील ११०९ तर तिरोडा तालुक्यातील १६०२ कुटुंबांना १०० दिवस काम देण्यात आले. उर्वरित कुटुंब १०० दिवस काम करु शकले नाही. ही प्रशासनाची कमजोरी आहे.५५३९ इंदिरा आवासमनरेगा अंतर्गत इंदिरा आवास योजनेचे काम केले जातात. संपूर्ण जिल्ह्यात या आर्थिक वर्षात पाच हजार ५३९ आवासांचे काम करण्यात आले. त्यात आमगाव तालुक्यात ११, अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ३२०१, देवरी तालुक्यात दोन, गोंदिया तालुक्यात १९६५, गोरेगाव तालुक्यात १४, सडक-अर्जुनी तालुक्यात नऊ, सालेकसा तालुक्यात आठ तर तिरोडा तालुक्यात ३२९ कामे करण्यात येत आहेत. परंतु पाहिजे त्या प्रमाणात नागरिकांना काम उपलब्ध न करुन दिल्यामुळे ६० लाख मुनष्य दिवस काम मार्च पर्यंत मजुरांना मिळेल का? असा सवाल उपस्थित होत आहे.
६० लाख मनुष्य दिवस काम मिळालेच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 6:00 AM
जिल्हा प्रशासनाचे मनरेगाच्या कामांकडे सपशेल दुर्लक्ष असल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील लोकांमध्ये बेरोजगारी वाढत आहे. १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या आर्थिक वर्षात गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना एक कोटी मनुष्य दिवस काम देणे अपेक्षीत होते. परंतु एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांच्या काळात ३९ लाख ८२ हजार २८५ मनुष्य दिवसच काम देण्यात आले.
ठळक मुद्देजिल्ह्यात बेरोजगारी : मनरेगाच्या कामांकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष