बिरसी-फाटा : तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दिड महिन्यांपूर्वी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर उघडण्यात आले होते. तेव्हापासून इतर सर्व रुग्णांसाठी या रुग्णालयातील सर्व वैद्यकीय सेवा-सुविधा बंद करण्यात आल्या होत्या. आमदार विजय रहांगडाले यांनी गुरुवारी (दि.२०) तिरोडा तालुका पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाच्या उपस्थितीत उपजिल्हा रुग्णालयाचा आढावा घेतला व इतर रुग्णसेवा सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे शुक्रवारपासून (दि. २१) येथील सर्व सेवा पूर्ववत सुरू करण्यात आल्या.
तिरोडा तालुका पत्रकार संघाच्या प्रयत्नाने बुधवारपासून (दि.१९) उपजिल्हा रुग्णालयात ओपीडी सुरू करण्यात आली. तर, रुग्णसुविधेच्या इतर सर्व वैद्यकीय सेवा ८ दिवसांनी सुरू होतील, असे सांगण्यात आले होते. पण, कोविड केंद्रात रुग्ण अत्यल्प असल्यामुळे या सेवासुविधा लवकरात लवकर सुरू व्हाव्यात, असे पत्रकार संघाला अपेक्षित होते. त्यामुळे पत्रकार संघाने आमदार रहांगडाले यांच्यासह उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. दरम्यान, बैठकीत आमदारांनी रुग्णालयाचा आढावा घेतला. यात वैद्यकीय अधीक्षक डॉ. हिंमत मेश्राम यांनी सांगितले की, येथील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये आजपर्यंत ३७० कोरोनाबाधित रुग्ण भरती करण्यात आले. आम्ही कोणताही रुग्ण दगावू दिला नाही. पण, जेव्हा रुग्णाला कुठेही खासगी रुग्णालयात खाट उपलब्ध होत नव्हती, अशा अंतिम वेळी रुग्णाला येथील शासकीय कोविड केंद्रात दाखल करण्यात आले. अशा ४२ रुग्णांचा मृत्यू झाला, तर सुरू करण्यात आलेल्या ओपीडीमध्ये ६० रुग्णांची नोंद झाल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार रहांगडाले यांनी कोविड केंद्रात अत्यल्प रुग्ण असल्यामुळे उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे योग्य नियोजन करून रुग्णालयातील इतर रुग्णांच्या सुविधेसाठी सर्व सेवा सुरू करण्यास सांगितले.