सालेकसा : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत तालुक्यात एकूण ८१ ग्रामपंचायत सदस्यांपैकी ५० महिला सदस्य निवडून आल्या आहेत. त्यामुळे ६२ टक्के महिलांना गाव विकासाची संधी मतदारांनी दिली आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीत महिलांचे वर्चस्व राहणार असून कोणत्याही निर्णय प्रक्रियेत त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
तालुक्यात एकूण नऊ ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यात आल्या. पंचायतराज व्यवस्थेत ग्रामपंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये किमान ५० टक्के महिला आरक्षण लागू आहे. त्यानुसार आरक्षणाची सोडत काढली जाते. तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींपैकी तीन ग्रामपंचायती अकरा सदस्यीय, तीन नऊ सदस्यीय, तर तीन आठ सदस्यीय आहेत. अकरा सदस्यीय ग्रामपंचायतींत सहा पदे महिलांकरिता राखीव तर नऊ सदस्यीयमध्ये पाच आणि सात सदस्यीयमध्ये चार पदे महिलांच्या वेगवेगळ्या प्रवर्गासाठी राखीव आहेत. यानुसार ८१ पैकी ४५ सदस्य महिलांसाठी राखीव होते. परंतु सातगाव, कारुटोला, कोटरा या ठिकाणी सर्वसाधारण जागेवर महिला सदस्य निवडून आले. अशा एकूण पाच महिला उमेदवार आरक्षणाशिवाय निवडून आल्या आहेत. त्यामुळे ८१ पैकी तब्बल ५० महिलांना ग्रामपंचायतवर निवडून जाण्याची संधी मिळाली. सरासरी ६२ टक्के महिला तर ३८ टक्के पुरुषांना ग्रामपंचायतीत प्रवेश मिळाला आहे.
बाॅक्स
लोकप्रतिनिधींना चिंतनाची गरज
ग्रामपंचायतीच्या निकालानंतर भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये दावे-प्रतिदावे करण्याची शर्यत लागली आहे. तरीसुद्धा विद्यमान लोकप्रतिनिधींना निवडणुकीच्या ठिकाणावर आत्मचिंतन करण्याची गरज आहे. तालुक्यातील कावराबांध, मुंडीपार, पाऊलदौना या ग्रामपंचायतींचे निकाल विद्यमान आमदाराच्या विरोधात जाणारे आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी न लागल्याने त्यांच्यात रोष आहे. एकूण ८१ पैकी ४३ सदस्य भाजप समर्थित निवडून आले आहेत. काँग्रेस आणि अपक्ष मिळून ३८ सदस्य निवडून आले आहेत. जि.प. क्षेत्रनिहाय विचार केला तर झालीया क्षेत्रात चार, तिरखेडी क्षेत्रात दोन आणि कारुटोला क्षेत्रात तीन ग्रामपंचायतींत निवडणुकांचे निकाल सजग करणारे आहेत.