गोंदिया व तिरोडा न.प. : गोंदियात सत्ताबदल टाळण्यासाठी सत्ताधारी सक्रियगोंदिया : गोंदिया व तिरोडा नगर पालिकेला आता नवीन नगराध्यक्षांचे वेध लागले आहेत. येत्या ६ आॅगस्टला विद्यमान नगराध्यक्ष-उपाध्यक्षांचा कार्यकाळ संपत आहे. त्याच दिवशी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया घेण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे.गोंदियात या निवडणुकीसाठी गोंदियाचे उपविभागीय अधिकारी तर तिरोडा न.प.साठी तिरोड्याचे उपविभागीय अधिकारी हे पिठासीन अधिकारी असणार आहेत.अडीच वर्षांपूर्वी झालेल्या गोंदिया नगर पालिकेच्या निवडणुकीत दोन अपक्षांच्या मदतीने सत्तेत जाऊन बसलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला आता पुन्हा मोठ्या अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. यावेळी संख्याबळ भाजप-सेनेकडे जास्त असल्यामुळे सत्ताबदल होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. नगराध्यक्षपदासाठी भाजपात अनेक जण फिल्डींग लावत आहेत. गोंदिया नगर पालिकेत भाजपाकडे सर्वाधिक १६ नगरसेवक आहेत. त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसकडे ११, काँग्रेसकडे ८, शिवसेनेकडे ३ तर दोन जागा अपक्ष उमेदवारांनी पटकावल्या होत्या. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजप-सेनेचे संख्याबल १९-१९ असे समान झाले होते. परंतू दोन्ही अपक्ष उमेदवारांना आपल्याकडे ओढण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला यश आले आणि १९ विरूद्ध २१ अशी आघाडी घेत दोन्ही काँग्रेसने सत्ता काबीज केली होती.परंतू काँग्रेसच्या ५ नगरसेवकांनी नगराध्यक्षपदासह सभापतीपद मिळविण्यासाठी गोंदिया लोकतांत्रिक काँग्रेस नावाने स्वतंत्र दबावगट स्थापन केला. त्यातील दोन जण काँग्रेसकडे परतल्याने वाचले. परंतू तिघांना पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपर जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविले. त्यामुळे भगतराम ठकरानी, ममता बन्सोड आणि निर्मला मिश्रा यांनी सदस्यत्व गमावल्यामुळे त्यांना या निवडणुकीत सहभागी होता येणार नाही. नगर पालिकेतील काँग्रेसचे संख्याबळ ८ वरून ५ वर आले आहे. त्यामुळे दोन अपक्षांना सोबत घेतले तरी राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचे संख्याबळ १८ तर भाजप-सेनेचे संख्याबळ १९ होत आहे. त्यामुळे भाजप-सेनेची सत्ता नगर पालिकेत येण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गोंदियाचा गड आपल्या हातून घालविणे काँग्रेससाठी खूप त्रासदायक ठरणार आहे. त्यामुळे केवळ एक नगरसेवक आपल्या बाजुने वळवून पुन्हा काँग्रेस-राकाँची सत्ता नगर पालिकेत कायम ठेवण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून धडपड सुरू आहे. परंतू त्यात त्यांना यश येण्याची शक्यता कमीच आहे. (जिल्हा प्रतिनिधी)तिरोड्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व राहणार कायमतिरोडा नगर पालिकेवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. या ठिकाणी १७ पैकी १५ नगरसेवक राष्ट्रवादीचे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते ठरवतील त्यालाच नगराध्यक्षपदाची संधी मिळणार आहे. गेल्या अडीच वर्षापासून राखी गुणेरिया नगराध्यक्षपद सांभाळत आहे. आता नगराध्यक्षपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असून अजय गौर यांचे नाव आघाडीवर आहे. त्याखालोखाल माजी नगराध्यक्ष नरेश कुंभारे, सलीम झवेरी चर्चेत आहेत.
६ ला नवीन नगराध्यक्षाची निवड
By admin | Published: July 26, 2014 2:17 AM