गोंदिया : शहरातील सिव्हिल लाईन येथील तनिष्का संतोष शर्मा (२४) या सॉफ्टवेअर इंजिनियरला क्रेडिट कार्डमध्ये लिमिट वाढवायची आहे, म्हणून आलेल्या फोनने त्यांना सात लाखाने गंडा दिला. ही घटना १७ एप्रिल रोजी सायंकाळी ६:४५ वाजता घडली.
तनिष्का शर्मा यांना एका व्यक्तीचा फोन आला. आपल्या क्रेडिट कार्डमध्ये लिमिट वाढवायचे आहे, असे बोलून त्यांच्या बँकेचे सर्व डिटेल्स त्यांनी घेतले. सोबत ई-मेल आयडी सारखी दिसणारी मेल आयडी जोडून त्या क्रेडिट कार्डचा लिमिट वाढविण्याच्या देखावा केला. त्यांच्या बँकेच्या खात्यावर १४ लाख ४०२ रुपये वैयक्तिक कर्ज घेऊन त्यामधील ७ लाख रुपये इंटरनेट बँकिंग प्रोफाईलमध्ये जोडलेल्या ई-मेल आयडीवर असलेल्या ओटीपीचा वापर करून ऑनलाईन ट्रांजेक्शन केले.
७ लाखाने त्यांची फसवणूक करण्यात आली. या घटनेसंदर्भात गोंदिया शहर पोलिसांनी १८ एप्रिल रोजी अज्ञात आरोपीवर भादंविच्या कलम ४२० सहकलम ६६ (सी) माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी करीत आहेत.