प्रशासनाचा अंदाज : ८०१ घरे व २८० गोठ्यांची झाली पडझडगोंदिया : जिल्ह्यातील आठही तालुक्यात चार दिवस झालेल्या संततधार पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज जिल्हा प्रशासनाकडे तहसीलदारांकडून बुधवारी सायंकाळी प्राप्त झाला. त्यात पडझडीमुळे ७० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.गोंदिया तालुक्यातील गंगाझरी मंडळ येथील अंदाजे १४६ घरे व ६३ गोठे, गोरेगाव तालुक्यातील ९८ घरे व ११ गोठे, तिरोडा तालुक्यातील २२१ घरे व १३ गोेठे, देवरी तालुक्यातील २२ घरे, आमगाव तालुक्यातील २१४ घरे व १५५ गोठे आणि सालेकसा तालुक्यातील १०० घरे व ३८ गोठ्यांची पडझड झाली आहे. आठही तालुक्यात अंदाजे ८०१ घरे व २८० गोठ्यांची पडझड झाली आहे. गोरेगाव तालुक्यात अंदाजे ९ लाख ५५ हजार, तिरोडा तालुक्यात २३ लाख ६१ हजार १००, देवरी तालुक्यात २ लाख ३८ हजार, आमगाव तालुक्यात २२ लाख १५ हजार ९०० आणि सालेकसा येथे १२ लाख १३ हजार ८०० असे एकूण ६९ लाख ८३ हजार ८०० रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. गोंदिया-बालाघाट मार्ग चालू झाला असून आमगाव तालुक्यातील शंभूटोला ते माल्हीमार्ग पूर्ववत सुरू झाला आहे. तसेच सालेकसा तालुक्यातील तिरखेडी ते सालेकसा व तिरोडा तालुक्यातील ढिवरटोला ते किडंगीपार मार्ग बंद आहे. अर्जुनी/मोरगाव, गोरेगाव, देवरी व सडक/अर्जुनी तालुक्यातील सद्यस्थितीत चालू असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाकडून प्राप्त झाली आहे. दरम्यान पावसाने उसंत घेतल्याने दिलासा मिळाला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
पावसामुळे ७० लाखांचे नुकसान
By admin | Published: July 24, 2014 11:54 PM