अंकुश गुंडावार।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र सरकारने दोन हेक्टर शेती असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान योजनेतंर्गत वर्षाकाठी ६ हजार रुपये मानधन देण्याची घोषणा २०१९ च्या अर्थसंकल्पात केली होती.यासाठी जिल्ह्यातील १ लाख ५६ हजार शेतकरी पात्र ठरले होते. मात्र आत्तापर्यंत या योजनेचा पहिला हप्ता केवळ ७२ हजार तर दुसरा हप्ता केवळ ४४ हजार लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आल्याची माहिती आहे.केंद्र सरकारने देशातील लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेची घोषणा केली होती. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेऊन एप्रिल महिन्यात या योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर तीन महिन्याच्या अंतराने दुसरा हप्ता जमा करण्याचे आश्वासन दिले होते. केंद्र सरकारने निवडणुकीच्या धामधुमीत या योजनेची घोषणा केली तसेच या योजनेसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या युध्द पातळीवर तयार करण्यासाठी महसूल व कृषी विभागाची संपूर्ण यंत्रणा कामाला लावली. या दोन्ही यंत्रांनी दोन हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी तयार करुन ती शासनाच्या अधिकृत संकेत स्थळावर अपलोड केली.गोंदिया जिल्ह्यात एकूण २ लाख ८० हजार खातेदार शेतकरी असून त्यापैकी या योजनेसाठी १ लाख ५६ हजार शेतकरी पात्र ठरले. पात्र ठरलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्या हप्त्याची रक्कम जमा व्हायला पाहिजे होती. मात्र पाच महिन्यांचा कालावधी लोटूनही आतापर्यंत केवळ ८४ हजार शेतकºयांच्या बँक खात्यात पहिला हप्ता जमा केला असून ७२ हजार शेतकरी पहिल्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. तर दुसऱ्या हप्त्याची स्थिती यापेक्षा बिकट आहे. केवळ ४४ हजार १४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दुसऱ्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात आली असून १ लाख १२ हजार शेतकरी दुसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत.विशेष म्हणजे या योजनेची घोषणा होऊन सहा महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी या योजनेचा लाभ पात्र सर्व शेतकऱ्यांना देण्यात केंद्र सरकार व संबंधित यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरली आहे.या योजने अंतर्गत हप्ते जमा होण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांना सुध्दा या योजनेबाबत शंका निर्माण झाली आहे.स्थानिक यंत्रणेचे काम केवळ याद्यांपुरतेचप्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेतंर्गत पात्र शेतकऱ्यांच्या याद्या तयार करुन त्या शासनाच्या संकेत स्थळावर अपलोड करणे ऐवढेच काम केवळ कृषी आणि महसूल विभागाच्या यंत्रणेचे आहे.त्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया ही शासन स्तरावरुन केली जाते.त्यामुळे किती शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्या व दुसऱ्या हप्त्याचे पैसे जमा झाले याची माहिती या विभागांना बँकाकडून घ्यावी लागते.त्यामुळे या यंत्रणांचे काम केवळ याद्या तयार करण्यापुरतेच आहे.लाभार्थी शेतकरी संभ्रमातप्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेतंर्गत एकूण पात्र शेतकºयांपैकी हजारो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाच महिन्यांचा कालावधी लोटूनही पैसे जमा झाले नसल्याने आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार की याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.याद्या तयार तरी विलंब काजिल्ह्यातील प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेतंर्गत पात्र ठरलेल्या १ लाख ५४ हजार शेतकºयांच्या नावांच्या याद्या तयार करुन त्या शासनाच्या संकेत स्थळावर अपलोड करण्यात आल्या आहे.मात्र यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्यास विलंब का होते आहे.याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी यावर अधिक बोलणे टाळले.
७२ हजार लाभार्थी शेतकरी पहिल्या हप्त्याच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 6:00 AM
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेऊन एप्रिल महिन्यात या योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर तीन महिन्याच्या अंतराने दुसरा हप्ता जमा करण्याचे आश्वासन दिले होते.
ठळक मुद्देप्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना : दुसरा हप्ता केवळ ४४ हजार शेतकऱ्यांना