नरेश रहिले
गोंदिया : प्रेमाच्या भूलथापा, प्रियकराने दिलेले आमिष, घरात झालेले तंटे व काही कारणांमुळे झालेले बालकांचे अपहरण यामुळे जिल्ह्यातून बेपत्ता किंवा अपरहण झालेल्या १८ वर्षांखालील १८ मुले व ५५ मुलींना शोधू गोंदिया पोलिसांनी त्यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. बेपत्ता व अपहरण झालेल्या बालकांच्या शोधाचे प्रमाण जिल्ह्यात कमी असल्यामुळे गोंदियाचे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी या बालकांच्या शोधासाठी एप्रिल महिन्यात सर्च मिशन राबवून ७३ बालकांना शोधले.
सर्वच साधने सहजरीत्या उपलब्ध झाल्याने आता कोवळ्या वयातच प्रेमाचे आकर्षण अनेक मुला-मुलींना वाटू लागते. आई-वडील आपल्या पाल्यांच्या हव्यासापोटी त्यांना पाहिजे ती साधने उपलब्ध करून देतात. शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींकडे मोबाइल दिला जातो. त्यामुळे ते मोबाइलच्या माध्यमातून सतत एकमेकाच्या संपर्कात राहतात. त्यातूनच त्यांचे प्रेम फुलते. मोबाइलचा चांगल्या गोष्टीसाठी वापर करण्याच्या हेतूने आई-वडील त्यांना मोबाइल देतात; परंतु त्याच्या विपरीत जाऊन आपले प्रेम फुलविण्यासाठी या मोबाइलचा अधिक वापर होत आहे. गोंदिया जिल्ह्यात प्रेमाचे आमिष देत तरुणींचे लैंगिक शोषण करण्याचेही प्रमाण अधिक आहे. वर्षाकाठी २०० च्या घरात लग्नाचे आमिष देऊन लैंगिक शोषण केल्याची प्रकरणे जिल्हा पोलिसांकडे दाखल केली जात आहेत. शेकडो प्रकरणे पोलीस ठाण्यांपर्यंत पोहोचतच नाहीत. अल्पवयीन मुलींना आपल्या जाळ्यात अडकवून प्रेमाच्या नाट्यातून त्यांचे लैंगिक शोषण करणारे कमी नाहीत. वर्ष दोन वर्ष प्रेमाच्या आणाभाका घेतल्यावर त्या मुलींना वाऱ्यावर सोडण्याचेही प्रकार जिल्ह्यात घडले आहेत. शासनाने बेपत्ता किंवा अपरहण झालेल्या बालकांना शोधण्यासाठी ऑपरेशन मुस्कान ही मोहीम राबविली; परंतु त्या ऑपरेशन मुस्कानमध्ये बालकांना शोधण्यात जे यश मिळाले नाही ते यश गोंदिया जिल्हा पोलिसांनी एप्रिल महिन्यात राबविलेल्या मोहिमेत मिळाले आहे. पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांनी आपापल्या हद्दीतील बेपत्ता व अपहरण झालेल्या बालकांची शोध मोहीम राबविण्याचे आदेश दिले. या आदेशामुळे गोंदिया जिल्ह्यातील १६ पैकी १४ पोलीस ठाण्यांनी आपापल्या पोलीस ठाण्यातील अपहरण झालेल्या बालकांचा शोध घेतला.
बॉक्स
गोंदिया ग्रामीण पोलिसांनी शोधले सर्वाधिक बालके
गोंदिया ग्रामीण पोलिसांनी ४ मुले, ८ मुली असे १२ बालकांचा शोध घेतला. गोंदिया शहर ४ मुली, रामनगर २ मुले, ८ मुली, रावणवाडी ५ मुली, तिरोडा १ मुलगा, ९ मुली, गंगाझरी १ मुलगा ६ मुली, दवनीवाडा ३ मुले, आमगाव ३ मुले ४ मुली, गोरेगाव १ मुलगा २ मुली, सालेकसा २ मुली, देवरी १ मुलगा, चिचगड १ मुलगा २ मुली, डुग्गीपार २ मुले १ मुलगी, अर्जुनी-मोरगाव ४ मुली असे एकूण १८ मुले व ५५ मुली असे ७३ बालकांना शोधण्यात आले.