नरेश रहिले
गोंदिया : गावाच्या विकासाची धुरा सांभाळणारी ग्रामपंचायतच शासनाच्या निधीची अफरातफर करीत असेल तर सर्वसामान्य जनतेने विकासाची अपेक्षा कोणाकडून करायची? गावचा विकास कमी आणि आपले खिशे गरम करण्यात मश्गुल असलेल्या काही सरपंच आणि ग्रामसेवक यांनाही चौकशीच्या दारात उभे करण्यासाठी नागरिकही मागे-पुढे पाहत नाहीत.
गोंदिया जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी शासकीय निधीची अफरातफर केल्याच्या तब्बल ४०८ तक्रारींत २० लाख १० हजार ६९७ रुपयांची अफरातफर केल्याने त्यांच्या तक्रारी जिल्हा परिषदेकडे आहेत. या तक्रारींची चौकशी जिल्हा परिषद करीत आहे. गोंदिया जिल्ह्यात ५४८ ग्रामपंचायती आहेत; परंतु यातील निम्म्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतींनी अफरातफर केल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेला करण्यात आल्या आहेत.
यातील सर्वाधिक तक्रारी असलेला तालुका तिरोडा आहे. त्यापाठोपाठ गोंदिया तालुक्याचा क्रमांक लागतो. त्यानंतर देवरी, सालेकसा, गोरेगाव, सडक-अर्जुनी, अर्जुनी-मोरगाव तर सर्वात कमी तक्रारी आमगाव तालुक्याच्या आहेत. गावात विकास कामे करताना काही लोक आडकाठी आणतात. तर काही ग्रामपंचायतींमधील पदाधिकारी व ग्रामसेवक शासनाच्या निधीची अफरातफर करतात. अनेकदा बोगस बिल लावून पैसे काढले जातात. या निधीची अफरातफर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी म्हणून गावातील सजग नागरिक जिल्हा परिषदेकडे तक्रार करतात. गोंदिया जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी केलेल्या तक्रारींच्या ४०८ प्रकरणांवर चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील चौकशी अहवाल आल्यावर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.
अफरातफरीत अडकले हे कर्मचारी
ग्रामपंचायतचा कारभार चालवित असताना शासकीय निधीची अफरातफर करणाऱ्या कर्मचाऱ्यांत ५९ ग्रामसेवक, ११ सरपंच, १ प्रशासक, २ ग्रामविकास अधिकारी यांचा समावेश आहे.
तिरोडा आघाडीवर अर्जुनी-मोरगाव पिछाडीवर
ग्रामपंचायतने केलेल्या अफरातफरीची तक्रार मुकाअ यांच्या दालनात गेली. तिरोडा तालुक्यातील १०० तक्रारी, गोंदिया तालुक्यातील ९७, आमगाव १६, सालेकसा ४४, देवरी ४८, गोरेगाव ४०, सडक-अर्जुनी ३७, अर्जुनी-मोरगाव २६ अशा ४०८ तक्रारी जिल्हा परिषदेकडे चौकशी करीत आहेत.
सहा प्रकरणांत आढळले दोषी
आतापर्यंत जिल्हा परिषदेकडे चौकशीसाठी असलेल्या ४०८ पैकी ६ प्रकरणांची चौकशी झाली असून, या सहाही प्रकरणात ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसेवक दोषी आढळले आहेत. ते सहाही प्रकरणे गोरेगाव तालुक्यातील आहेत.