नरेश रहिले
गोंदिया : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राने प्राथमिक शिक्षणात आमूलाग्र बदल करण्याचा मानस केला असला तरी भौतिक सुविधेअभावी पाहिजे त्या प्रमाणात जि. प. शाळांचा उत्थान होऊ शकला नाही. आजही गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या ७३० वर्ग खोल्या विद्यार्थ्यांच्या जीवावर उठल्या आहेत. ह्या वर्गखोल्या विद्यार्थ्यांसाठी बसण्यायोग्य नाहीत.
शासनाने जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम सुरू केला. या उपक्रमातून वाचन आनंद दिवस, ज्ञान रचनावाद, डिजीटल शाळा, अक्षर सुधार कार्यक्रम असे विविध उपक्रम साजरे करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थी शहरातील खासगी शाळांच्या विद्यार्थ्यांपेक्षाही स्मार्ट व्हाव्यात यासाठी गोंदियाच्या शिक्षण विभागाने विविध उपक्रम राबविले. भौतिक सुविधेसाठी गावची शाळा आमची शाळा हा उपक्रम सुरूच ठेवला; परंतु अपुऱ्या निधीमुळे गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ७३० च्या घरात वर्गखोल्या ज्ञानार्जनासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत धोकादायक आहेत.
...............................
जिल्ह्यातील एकूण शाळा- १०३९
एकूण विद्यार्थी-
वर्गखोल्यांची दुरुस्ती आवश्यक - ६७७
..................
१३९ नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम कधी होणार?
१) गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांत आजघडीला १३९ वर्ग खोल्यांची नितांत गरज आहे. त्या वर्ग खोल्या मिळाल्यावर विद्यार्थ्यांना बसण्याची सोय होईल.
२) गोंदिया जिल्ह्यासाठी गरज असलेल्या वर्गखोल्यांची माहिती शासनाला पाठवून सरकारकडून या वर्गखोल्यांची मागणी गोंदियाच्या जि. प. मधील प्राथमिक शिक्षण विभागाने केली आहे.
३) गोंदिया जिल्ह्यातील ६७७ वर्गखोल्यांची त्वरित दुरुस्ती करण्याची गरज आहे.
......................
कोणत्या तालुक्यात किती शाळा धोकादायक?
आमगाव- ७९
अर्जुनी-मोरगाव-९३
देवरी-९०
गोंदिया-११९
गोरेगाव-१०३
सडक-अर्जुनी-६८
सालेकसा-७०
तिरोड-१०८
..........
अशा शाळेत मुले पाठवायची कशी?
१) जीर्णावस्थेत असलेल्या वर्गखोल्यात चिमुकली बालके खेळता-खेळता गेली तर अनुचित प्रकार घडू शकतो. यासाठी वर्गखोल्यांची दुरूस्ती केल्याशिवाय मुलांना शाळेत पाठविणे शक्य होणार नाही. सरकारने लक्ष देऊन जीर्णावस्थेत असलेल्या वर्गखोल्या दुरूस्ती कराव्यात.
- योगेश खोटेले, डोंगरगाव, पालक
२) धोकादायक असलेल्या वर्गखोल्यांवर पावसाळ्यात पाणी गेले तर विपरीत घटना घडू शकते. यासाठी दुरुस्तीसाठी असलेल्या वर्गखोल्या दुरुस्त करण्यात याव्यात. अत्यंत धोकादायक असलेल्या वर्गखोल्यांचे जीर्णोद्धार करणे आवश्यक आहे. याशिवाय मुलांना शाळेत पाठविणे धोकादायक आहे.
- ममता पाऊलझगडे, किडंगीपार पालक
....................
कोट
जि.प.च्या १०३९ शाळांपैकी ४७६ शाळांमध्ये ७३० वर्गखोल्या धोकादायक आहेत. या वर्गखोल्यांना पाडण्यासाठी व या खोल्यांमध्ये जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहे.
- राजकुमार हिवारे, शिक्षणाधिकारी जि.प. गोंदिया.