गोंदिया : शासनाने कोरोनाची लस सर्व देशवासीयांना मोफत दिली जाणार असल्याचे स्पष्ट केले असून त्यानुसार सर्वत्र कोरोना लस आता शासकीय लसीकरण केंद्रांवर मोफत लावून दिली जात आहे. मात्र शासकीय केंद्रांवर अधिकच भार पडणार असल्याचे बघता शहरातील ६ खासगी रुग्णालयांनाही लसीकरणासाठी परवानगी देण्यात आली होती. मोफत लस दिली जात असल्याने व स्वत:ला लस घेऊन सुरक्षित करून घेण्यासाठी शासकीय लसीकरण केंद्रांवर आता रांगाच रांगा लागत आहेत. यामुळे लस घेण्यासाठी तासन्तास रांगेत ताटकळत राहण्याची पाळी नागरिकांवर आली आहे. यात मात्र वृद्धांची चांगलीच पंचाईत होत आहे. शिवाय ज्यांच्या घराजवळ केंद्र आहे त्यांचे ठीक अन्यथा लांब अंतरावर जावे लागत असल्याने ७५७८ नागरिकांनी पैसे देऊन खासगी रुग्णालयात जाऊ लस घेतली आहे. यामुळे एकतर गर्दीत तासन्तास ताटकळत राहण्यापेक्षा पटकन जाऊन पटकन लस घेता आली. शिवाय गर्दी नसल्याने कोरोनाचा धोकाही पत्करण्याची त्यांना गरज पडली नाही.
----------------------------
आतापर्यंत झालेल लसीकरण
- पहिला डोस- ३८७२२२
- दुसरा डोस- ९६८३६
-----------------------
खासगी रुग्णालयातील आकडे काय सांगतात?
- न्यू गोंदिया हॉस्पिटल - ६२१
- गोंदिया केअर हॉस्पिटल- १८९६
- राधेकृष्ण हॉस्पिटल- ८२४
-बालाजी हॉस्पिटल- २४१२
- ब्राम्हणकर हॉस्पिटल- १२२०
- धुर्वे हॉस्पिटल- ६०५
--------------------------------
शासकीय रुग्णालयात का नाही
१) शासकीय रुग्णालयांमध्ये शासनाकडून मोफत लस दिली जात असल्याने नागरिकांनी एकच गर्दी होत आहे. यामुळे तेथे गेल्यावर आपला नंबर येईपर्यंत ताटकळत रहावे लागते.
२) लसीकरणासाठी लागणाऱ्या रांगेत नागरिकांकडून शारीरिक अंतराचे पालन होत नाही. अशात एखादी व्यक्ती बाधित असल्यास त्यापासून संसर्गाचा धोका असतो.
३) शासकीय लसीकरण केंद्रांवर गर्दी बघता वृद्धांना एवढा वेळ रांगेत लागून राहणे शक्य नाही. करिता खासगी रुग्णालयात पैसे देऊन लस लावून घेणे सोयीस्कर आहे.
४) काही भागातील लसीकरण केंद्र दूर अंतरावर असून त्यात होणार गर्दी बघता घराजवळील खासगी हॉस्पिटलमध्ये पैसे देऊन लगेच लस लावून घेणे सोयीचे ठरते.
-------------------------
कोट
शासकीय लसीकरण केंद्रांवर गर्दी वाढली असून तेवढा वेळ रांगेत लागणे आमच्यासाठी आता शक्य नाही. शिवाय गर्दीत जाणे सुरक्षित नसल्याने घराजवळील खासगी हॉस्पिटलमध्ये पैसे देऊन लस घेतली. ते अधिक सुरक्षित होते व लगेच लस लावून घरी परत ही आले.
- राजश्री केकत
--------------------------
शासकीय लसीकरण केंद्रांवर शासनाकडून लस मोफत मिळत आहे. मात्र तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने आम्हाला रांगेत ताटकळत राहणे आता जमणार नाही. त्यामुळे घराजवळील खासगी हॉस्पिटलमध्ये जाऊन लस घेतली.
- अनिता वाढई