९४ टक्के उद्दीष्ट पूर्ती : आधार नोंदणीची मोहिम थंडावली कपिल केकत गोंदिया शासनाने प्रत्येकाला आधारकार्ड नोंदणी बंधनकारक केली असतानाही जिल्ह्यातील ७६ हजार ३४४ नागरिक अद्याप निराधारच दिसून येत आहेत. सन २०१५ च्या लोकसंख्येनुसार याची टक्केवारी ९४.५४ एवढी आहे. त्यामुळे आधारकार्ड नोंदणीसाठी पुन्हा एकदा मोहिम राबविण्याची गरज दिसून येत आहे. आज प्रत्येकच कामासाठी शासनाने आधारकार्ड आवश्यक केले आहे. लहान्यांपासून ते मोठ्यांपर्यंत यात ग्रामीण असो वा शहरी प्रत्येकालाच आधारकार्ड नोंदणी करणे बंधनकारक व तेवढेच आवश्यक झाले आहे. आजच्या स्थितीत बँक खाते असो वा शाळेतील प्रवेश प्रत्येकच कामासाठी पालक व पाल्य दोघांच्या आधारकार्डची हमखास गरज भासत आहे. एवढेच नव्हे तर शासकीय अनुदान व अन्य लाभांसाठीही आधारकार्ड क्रमांक मागीतला जातो. यावरून आजच्या स्थितीत आधारकार्ड किती महत्वाची वस्तू बनली आहे याची प्रचिती येते. कोणतेही काम असल्यास आधारकार्ड लागणारच अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या आधाराकार्डसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. त्याचप्रमाणात शिबिर घेऊन आधारकार्ड नोंदणी करण्यात आली. याचे फलीत असे आहे की, सन २०१५ च्या लोकसंख्येनुसार १३ लाख ९९ हजार १४ नागरिकांतील १ लाख २२ हजार ६७० नागरिक आज आधारकार्ड धारक आहेत. मात्र यातील उरलेले ७६ हजार ३४४ नागरिक अद्याप निराधार म्हणजेच ज्यांच्याकडे आधारकार्ड नाही असे आहेत. टक्केवारी नुसार जिल्ह्यातील ९४.५४ टक्के नागरिकांनी आपली आधार नोंदणी केलेली नाही. परिणामी जिल्हा अद्यापही पूर्णपणे आधारकार्ड नोंदणीकृत झालेला नाही. यासाठी आधार नोंदणीसाठी पूर्वी राबविण्यात आलेली मोहिम थंडावल्याचे दिसून येत आहे. परिणामी नागरिकांनाही त्याचा विसर पडला असून हे काम रेंगाळत चालले आहे. करिता पुन्हा आधारकार्ड नोंदणीसाठी मोहिमेची गरज आहे. आधार नोंदणी मोहिमेची गरज सुरूवातीला आधारकार्ड नोंदणीसाठी शासनाकडून मोहिम राबविण्यात आली. परिणामी नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घेत आपली आधारकार्ड नोंदणी करवून घेतली. मात्र आज ही मोहिम थंडावली आहे. कित्येकांना आता नोंदणी कुठे सुरू आहे हेच माहिती नसल्याने त्यांनीही दुर्लक्ष केले आहे.सध्या बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे २३ मशिन्स दिल्याची माहिती आहे. मात्र नोंदणीबाबत काहीच माहिती नाही. त्यामुळे ही मोहिम पु्न्हा एकदा राबविल्यास नक्कीच त्याचा फायदा मिळणार. २०११ च्या लोकसंख्येची उद्दीष्टपूर्ती प्राप्त आकडेवारीनुसार सन २०११ ची लोकसंख्या १३ लाख २२ हजार ५०७ एवढ नोंद असून तेवढी आधार नोंदणी झाल्याचे कळते. म्हणजेच सन २००११ च्या लोकसंख्येची उद्द्ीष्टपूर्ती झाली आहे. मात्र सन २०१५ ची लोकसंख्या वाढून १३ लाख ९९ हजार ०१४ एवढी असून त्यातील ७६ हजार ३४४ नागरिक आधार नोंदणीपासून वंचीत आहेत. परिणामी सन २०१५ च्या लोकसंख्येची उद्दीष्टपूर्ती झालेली नाही.
अर्जुनी-मोरगाव व आमगाव तालुका अग्रेसर आधार नोंदणीच्या या कार्यक्रमात जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव व आमगाव तालुका अग्रेसर असून त्यांनी १०० टक्के नोंदणी केली आहे. तर गोंदिया तालुक्यात ७३.३१ टक्के, गोरेगाव तालुक्यात ९०.४४ टक्के, तिरोडा तालुक्यात ९१.२५ टक्के, देवरी तालुक्यात ९५.७४ टक्के, सालेकसा तालुक्यात ८८.४७ टक्के व सडक-अर्जुनी तालुक्यात ८०.०४ टक्के नोंदणी झाल्याची माहिती आहे.