गोंदिया : रेशन वितरण प्रणालीअंतर्गत वितरीत करावयाचे सुमारे ८९ हजार क्विंटल तांदूळ गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यातील २६ राईस मिलर्सकडे पडून आहे. शासनाने महामंडळांच्या माध्यमातून खरेदी केलेले १ लाख २५ हजार क्विंटल धान तांदूळ बनविण्यासाठी सन २०१२-१३ मध्ये राईस मिलर्सना दिले होते. मात्र प्रशासनाच्या लापरवाहीमुळे या तांदळाची अद्याप उचल करण्यात आली नाही. शासन आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून आधारभूत किंंमतीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून धान खरेदी करते. तर या धानापासून तयार करण्यात आलेले तांदूळ रेशन वितरण प्रणालीच्या माध्यमातून कार्डधारकांना वितरीत केले जाते. यांतर्गत सन २०१२-१३ मध्ये शासनाने धान खरेदी केली व त्यातील एक लाख २५ हजार क्विंटल धान राईस मिलर्सना तांदूळ बनविण्यासाठी दिले. दिलेल्या धानातून ६७ टक्केच्या हिशोबाने सुमारे ८९ हजार क्विंटल तांदूळ राईस मिलर्सकडून प्राप्त करावयाचा होता. मात्र सुमारे प्रशासनाच्या लापरवाहीमुळे सुमारे ११ कोटी रूपयांच्या ८९ हजार क्विंटल तांदळाची राईस मिलर्सकडून उचल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे धानापासून तयार करण्यात आलेल्या या तांदळाची ३१ डिसेंबर २०१३ पर्यंत उचल करून त्याला रेशन वितरण प्रणालीअंतर्गत जिल्ह्यातील कार्डधारकांना वितरीत करायचे होते. मात्र कोट्यवधीचा तांदूळ अद्याप राईस मिलर्सकडेच पडून आहे. (शहर प्रतिनिधी)
८९ हजार क्विंटल तांदूळ राईस मिलर्सकडेच
By admin | Published: January 15, 2015 10:54 PM