जलयुक्त शिवार योजना : आमदारांनी घेतला कामांचा आढावा तिरोडा : गतिमान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कमी खर्चामध्ये व शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभ तसेच पाणी टंचाई दूर करण्याच्या दृष्टीने व जलस्तर वाढविण्याकरिता स्थानिक तहसील कार्यालय तिरोडा येथे जलयुक्त शिवार योजनेची सुरुवात केली. तिरोडा तालुक्यातील या कामांचा आढावा आमदार विजय रहांगडाले यांनी घेतला. यात पंचायत समितीमार्फत १३ कामे घेण्यात आली असून ८० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली.सदर कामांची प्रशंसा महाराष्ट्रात तर नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये होत आहे. याच जलयुक्त शिवार योजनेतून आ. विजय रहांगडाले यांनी सन २०१६-१७ जलयुक्त शिवार योजनेत असलेले गाव सोनेगाव येथे चार तलावांना जोडून एक मोठा तलाव बनविण्याकरिता समाविष्ट केले आहे. या कामाची सुरुवात होणार असून या तलावाच्या माध्यमाने ५०० हेक्टर शेतजमीन सिंचित होणार असून मोठा जलसाठा निर्माण होणार आहे. या विषयी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली असता आमदार विजय रहांगडाले यांचे प्रशंसा करण्यात आली. हे एक जलयुक्त शिवारमधील ड्रीम प्रोजेक्ट ठरणार आहे. तसेच तिरोडा तालुका हा जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवार योजनेत प्रथम क्रमांकावर असून या योजनेमध्ये पंचायत समितीमार्फत १३ कामे घेण्यात आली असून ८० टक्के कामे पूर्ण झालेली आहेत. कृषी विभागामार्फत २१५ कामे, वनविभागामार्फत आठ कामे, लघूसिंचन पाच कामे, ग्रामीण पाणीपुरवठामार्फत ११ कामे व इतर तलाव खोलीकरणाची कामे सीएसआर निधीच्या माध्यमाने झालेली आहेत. सन २०१६-१७ ची उर्वरित कामे यावर्षी पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आढावा बैठकीमध्ये तिरोडा उपविभागाचे उपविभागीय अधिकरी सुनील सूर्यवंशी, तहसीलदार रविंद्र चव्हाण, गटविकास अधिकारी मानकर, तालुका कृषी अधिकारी पोटदुखे, वनपरिक्षेत्राधिकारी विजय कदम व इतर संबंधित सर्व अधिकारी उपस्थित होते. तसेच धडक योजनेमध्ये जिल्ह्यात पाच हजार विहिरी बांधण्याचे उद्दिष्ट असून या योजनेतून सर्वात जास्त विहिरी तिरोडा क्षेत्रात व्हाव्यात, असे निर्देशसुद्धा अधिकाऱ्यांना दिले. शेतकऱ्यांना धडक योजनेच्या विहिरींचा लाभ घ्यावा, असे आवाहन आ. विजय रहांगडाले यांनी केले. (प्रतिनिधी)
८० टक्के काम पूर्ण
By admin | Published: September 21, 2016 12:52 AM