संरक्षण पथकाची कारवाई : तिरोडा तालुक्याच्या गोविंदटोला बिटातील घटनागोंदिया : तिरोडा तालुक्याच्या गोविंदटोला बिटातील वनविभागाने लावलेले सागवन चोरी करून चिरान काढून साहित्य तयार करणाऱ्या एका ठिकाणी उपवनसंरक्षक कार्यालयातील संरक्षण पथकाने बुधवारी धाड घालून ८० हजाराची सागवन चिरान जप्त केले. या संदर्भात अधिक माहिती घेणे सुरू आहे.गोविंदटोला येथील किरसान नावाच्या या शेतकऱ्याकडे ते चिराण आढळले. मात्र हे चिराण आपल्या शेतातील लाकडापासून असल्याचे त्याचे म्हणणे आहे. उपवसंरक्षक जितेंद्र रामगावकर यांना या प्रकरणात मिळालेल्या माहितीवरून तसेच तिरोडा येथील वनपरीक्षेत्राधिकारी एम.के. चाटी यांच्या अनेक अनागोंदी कारभाराची माहिती उपवनसंरक्षक गोंदिया यांना झाल्यामुळे त्यांनी सदर कारवाई करण्यासाठी आपल्या अधिनस्थ असलेल्या संरक्षण पथकाला पाठविले. खसरा प्रकरणातही वनपरिक्षेत्राधिकारी एम.के. चाटी मोठ्या प्रमाणात घोळ करीत असल्याची माहिती मिळाल्यामुळे वनसंरक्षकांनी सदर कारवाईचे आदेश चाटी यांना न देता संरक्षण पथकाकडे दिले. तिरोडा तालुक्यातील अनेक ठिकाणची सागवनाची झाडे सर्रास कत्तल केली जात आहेत.मात्र याकडे तेथील वनाधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याची बाब वरिष्ठांच्या लक्षात आली आहे. ही कारवाई चाटी यांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करते. (तालुका प्रतिनिधी)
८० हजाराचे सागवान जप्त
By admin | Published: February 26, 2016 2:00 AM