गोंदिया - जिल्ह्यात मागील दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे तिरोडा तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान तिरोडा-मार्गावरील विद्युत खांब पुरामुळे मंगळवारी (दि.१६) दुपारच्या सुमारास कोसळले. त्यामुळे तालुक्यातील मुंडीकोटा, सुकडी डाकराम, वडेगाव परिसरातील ८० गावांचा विद्युत पुरवठा दुपारपासूनच ठप्प झाल्याने या भागातील नागरिकांना अंधारातच रात्र काढावी लागणार आहे.
अतिवृष्टीमुळे वैनगंगा नदी दुथडी भरुन वाहत असल्याने तिरोडा तालुक्यातील चांदोरी खुर्द, घाटकुरोडा, धापेवाडा, लोधीटोलासह अनेक गावांना पुराने वेढा घातला आहे. यामुळे या गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. दरम्यान मंगळवारी दुपारच्या सुमारास तिरोडा-माडगी मार्गावरील विद्युत खांब पुराच्या पाण्यामुळे कोसळल्याची माहिती आहे. यामुळे सुकडी डाकराम, मुंडीकोटा व वडेगाव या परिसरातील ८० गावांचा विद्युत पुरवठा दुपारपासूनच ठप्प झाला आहे. या परिसरात पूर परिस्थिती कायम असल्याने विद्युत दुरुस्तीचे काम करण्यात अडचणी येत आहेत. पूर ओसरल्यानंतरच विद्युत दुरुस्तीचे काम करता येणार असून तोपर्यंत या ८० गावातील नागरिकांना अंधारात काढावे लागणार आहे. त्यामुळे गावकऱ्यांना पूर परिस्थितीसह आता विजेच्या समस्येला सुध्दा तोंड द्यावे लागणार आहे.