अर्जुनी-मोरगाव : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित ‘सन्मान सावित्रीच्या लेकीचा’ उपक्रमांतर्गत महिला शिक्षिका-भगिनींचा सत्कार करण्यात आला. यासाठी तालुक्यातील प्रत्येक शाळेत जाऊन ८ ते १० मार्च या ३ दिवसांत शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण ८३ महिला शिक्षिका-भगिनींचा पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार केला.
यावेळी उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले व नायब तहसीलदार रेखा रंगारी यांचासुद्धा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. स्त्री शिक्षणाचे महत्त्व ओळखून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, महर्षी कर्वे, छत्रपती शाहू महाराज यासह अनेक समाजसुधारकांनी स्त्री शिक्षणाला प्राधान्य देऊन समाजात महिलांना सन्मान मिळवून दिला. राजकारण, समाजकारण, शिक्षण, विज्ञान, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात महिला उल्लेखनीय कामगिरी करीत आहेत. सामाजिक जाणिवेतून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेत शिक्षण क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने महिला कर्तव्य बजावून उत्स्फूर्तपणे मुलांच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्न करून निष्ठापूर्वक समाज घडणीमध्ये कार्य करीत आहेत. शिक्षण क्षेत्रात करीत असलेल्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीकडून अशा लेकींचा सन्मान करण्यात आला.