अंकुश गुंडावारलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर तीन हप्त्यांत सहा हजार रुपये जमा केले जातात. यासाठी पात्र शेतकऱ्यांना ३१ मेपर्यंत आधारकार्डसह इतर कागदपत्रे जोडून केवायसी करणे अनिर्वाय केले होते. केवायसी न करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागणार, असे केंद्र शासनाने स्पष्ट केले. जिल्ह्यात या योजनेचे एकूण २ लाख ६१ हजार १२९ लाभार्थी असून ३१ मेपर्यंत यापैकी केवळ १ लाख ७७ हजार ८७७ शेतकऱ्यांनी केवायसी केले आहे. तर तब्बल ८३ हजार २५२ शेतकऱ्यांनी केवायसी केले नाही. परिणामी या शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत मिळणाऱ्या ६ हजार रुपयांच्या पेन्शनला मुकावे लागणार आहे. या योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना केवायसी करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तर बऱ्याच शेतकऱ्यांना इंटरनेट आणि केवायसी करण्याचे संकेतस्थळ बराच वेळ बंद राहत असल्याने ३१ मेपर्यंत केवायसी करता आले नाही. याचा फटका ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बसला. जिल्ह्यातील ८३ हजार शेतकरी केवायसीपासून वंचित असल्याने शासन याला मुदतवाढ देते काय याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
३१ मेपर्यंतची होती डेडलाइन पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत केवायसी करण्यासाठी शासनाने ३१ मेपर्यंत डेडलाईन दिली होती. या कालावधीत बऱ्याच शेतकऱ्यांनी केवायसी केले. मात्र काही शेतकऱ्यांना इंटरनेट व संकेतस्थळ बंद असल्याचा फटका बसला.
१ लाख ७७ हजार ८७७ मिळणार पेन्शनपंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी तीन टप्प्यांत ६ हजार रुपये त्यांच्या बँक खात्यावर जमा केले जाते. जिल्ह्यातील २ लाख ६१ हजार १२९ शेतकऱ्यांपैकी १ लाख ७७ हजार ८७७ शेतकऱ्यांनी केवायसी केले असून या शेतकऱ्यांना नियमित पेन्शन मिळणार आहे.
८३ हजार २५२ शेतकऱ्यांनी केवायसी नाही- जिल्ह्यातील ८३ हजार २५२ शेतकऱ्यांनी ३१ मेपर्यंत केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना आता पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेंतर्गत मिळणाऱ्या ६ हजार रुपयांच्या पेन्शनला मुकावे लागणार आहे.
पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत एकही शेतकरी केवायसीपासून वंचित राहू नये यासाठी जिल्ह्यात शिबिरांचे आयोजन करण्यात आले. जास्तीत शेतकऱ्यांना केवायसी करता यावे, यासाठी प्रशासनातर्फे मदत करण्यात आली. - महसूल अधिकारी