कामांचा खोळंबा : वर्ग एकच्या ५९ अधिकाऱ्यांची कमतरता गोंदिया : येथील जिल्हा परिषदेला रिक्त पदांचे ग्रहण लागले असून वर्ग एक व वर्ग दोन च्या ८८ अधिकाऱ्यांची पदे रिक्त पडून आहेत. एवढ्या मोठ्या संख्येत ्अधिकाऱ्यांची पदे रिक्त पडून असल्याने मात्र जनतेची काम अडून पत असतानाच खुद्द जिल्हा परिषदेतील संबंधीत विभागांच्या कामांचाही खोळंबा होत आहे. नागरिकांची कामे होत नसल्याने जिल्हा परिषद विरूध्द नागरिकांचा असंतोष उफाळून येत आहे. यात, २८ आॅक्टोबर २०१६ पासून अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नाहीत. २७ जून २०११ पासून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक, ३० एप्रिल २०१५ पासून वरिष्ठ लेखा अधिकारी, ३१ जानेवारी पासून पं.स. व कृषी असे दोन सहायक प्रकल्प अधिकारी, ४ डिसेंबर २००२ पासून उपअभियंता नाही. मनरेगाचे उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक यांची पदस्थापना झाली, परंतु रुजू झाले नाही. १ आॅगस्ट २०१५ पासून समाज कल्याण अधिकारी नाहीत. देवरी पंचायत समिती येथे ३ जुलै २०१६ पासून गटविकास अधिकारी नाही. गट अ च्या १८ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदस्थापना झाली परंतु ते रुजू झाले नाही. ग्रामीण पाणी पुरवठा उपकार्यकारी अभियंतांची पद स्थापना झाली पण तेही रुजू झाले नाही. १ फेब्रुवारी २०१५ पासून उपअभियंता (यांत्रिकी) यांचे पद रिक्त आहे. १ डिसेंबर २०१६ पासून बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याचे पद रिक्त आहे. आमगाव, सडक-अर्जुनी व जिल्हा परिषदेतील प्रत्येकी एक असे तीन उपअभियंत्यांचे पद रिक्त आहे. २२ पशुधन विकास अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे. ११ डिसेंबर २०१५ पासून माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे पद, आॅगस्ट २०१६ पासून सहायक आरोग्य अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे. अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे पद असे एकूण ६९ पदे, वर्ग १ च्या अ गटातील पदे रिक्त आहेत. वर्ग २ च्या ब गटातील जिल्हा कृषी अधिकारी सामान्य हे पद १ नोव्हेंबर २०११ पासून, विशेष घटक योजनेचे जिल्हा कृषी अधिकारी १२ जुलै २०१० पासून, कृषी विभागाचे मोहीम अधिकारी ६ जून २०१४ पासून, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी ३ सप्टेंबर २०१५ पासून, शालेय पोषण आहार लेखाधिकारी ३० जून २०१४ पासून तीन गटशिक्षणाधिकारी ३० एप्रिल २०१४ पासून, ८ बालविकास प्रकल्प अधिकारी ३० एप्रिल २०१४ पासून, शालेय पोषण आहाराचे ५ अधिक्षक ३० एप्रिल २०१४ पासून, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे दोन लेखाधिकारी ४ डिसेंबर २००४ पासून नाहीत. गट ब चे ४ वैद्यकीय अधिकारी ४ डिसेंबर २००४ पासून, प्रशिक्षण केंद्रातील एक वैद्यकीय अधिकारी ४ डिसेंबर २००४ पासून तर नरेगाचे कृषी अधिकारी हे एक पद निर्मीतीपासूनच रिक्त आहे. मिनी मंत्रालयात ८८ अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने या विभागांचा कारभार प्रभाऱ्यांच्या खांद्यावर असल्याने आपण नियमित नाही या भितीपोटी ते अधिकारी काम करीत नाही. कोणत्याही फाईलवर कार्यवाही करण्यासाठी प्रभारी धजावत्त नाही. मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने मिनी मंत्रालयात कामाचा खोळंबा होतो. नागरिकांची कामे वेळेवर होत नाही. पदाधिकारी काम करवून घेण्याच्या तयारीत जरी असले तरी अधिकारीच नसल्यामुळे मिनी मंत्रालय आज खाली-खाली आहे. (तालुका प्रतिनिधी)
मिनी मंत्रालयात ८८ अधिकाऱ्यांची पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2017 1:25 AM