पॉझिटिव्ह स्टोरी
विजय मानकर
सालेकसा (गोंदिया) : तालुक्यातील एकूण सर्व छोट्या मोठ्या १८५ गावांपैकी ८९ गावांमध्ये मागील दीड वर्षांत कोविडचा एकही रुग्ण आढळला नाही. २०२१ मध्ये एप्रिल मे महिन्यात आलेल्या दुसऱ्या लाटेदरम्यान या गावच्या ग्रामस्थांनी कोरोनाला वेशीबाहेरच रोखले. आरोग्य विभागाची जनजागृती गावकऱ्यांची सतर्कता आणि कोरोनासंबंधी नियमांचे पालन केले. कोरोनाचा संसर्ग ज्या लोकांमुळे होऊ शकतो अशा संशयित लोकांना गावात मुळीच प्रवेश करू दिला नाही. त्यामुळे ही किमया साधता आली.
यंदा कोरोनाची दुसरी लाट आली असता याचा सर्वांत जास्त फटका महाराष्ट्राला बसला असून, जवळपास एक तृतीयांश रुग्ण एकट्या महाराष्ट्रात सापडले. अर्थात यावेळी महाराष्ट्रात मोठ्या शहरासह ग्रामीण भागातील छोट्या गावांमध्ये सुद्धा कोरोनाचा शिरकाव झाला. काही गावांमध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडले. परंतु ज्यांनी दक्षता घेतली, कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केले त्यांना कोरोनाला गावाच्या वेशीवरच रोखण्यात यश आले. गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यामध्ये इतर सातही तालुक्याच्या तुलनेत सर्वांत कमी लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २५ आहे. तालुक्यात एकूण चार प्राथमिक आरोग्य केंद्र आणि २३ उपकेंद्रांतर्गत कार्यरत आरोग्य चमूने गावामध्ये कोरोनाचा प्रसार वाढू नये यासाठी लोकांना सतत मार्गदर्शन केले, त्यामुळे अनेक गावांना कोरोनापासून दूर ठेवता आले. प्राथमिक आरोग्य केंद्र कावराबांधअंतर्गत एकूण ३१ गावांचा समावेश असून, त्यापैकी १४ गावांनी आपल्या हद्दीत कोरोनाला प्रवेश करू दिला नाही. यामध्ये कावराबांध उपकेंद्रातील दोन, खोलगड उपकेंद्रातील दोन, सोनपुरी उपकेंद्रातील तीन, लटोरी उपकेंद्रातील दोन, खेडेपार उपकेंद्रातील चार आणि झालीया उपकेंद्रातील एक गावाचा समावेश आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र सातगाव अंतर्गत ३० गावे असून, यातील आठ गावे कोरोनाला गावाबाहेर ठेवण्यात यशस्वी झाली. यामध्ये गिरोला उपकेंद्रातील दोन, धानोली उपकेंद्रातील दोन, मक्काटोला उपकेंद्रातील दोन आणि भजेपार उपकेंद्रातील दोन असे एकूण आठ गावांचा समावेश आहे. बिजेपार प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत एकूण ४२ गवांचा समावेश असून यापैकी एकूण २४ ागावांनी कोरोनाला वेशीबाहेर रोखले. यात बिजेपार उपकेंद्रातील पाच गावे, मानागड उपकेंद्रातील सात गावे तसेच तिरखेडी, कोटरा आणि लोहारा उपकेंद्रातील प्रत्येकी चार-चार गावांचा समावेश आहे. दरेकसा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत एकूण ६७ गावांपैकी ४३ गावांतील लोकांनी गावात कोरोनाचा प्रवेश होऊ दिला नाही. यामध्ये नवाटोला उपकेंद्रातील नऊ, कहाली उपकेंद्रातील चार, पिपरिया उपकेंद्रातील १२, जमाकुडो उपकेंद्रातील नऊ आणि दरेकसा उपकेंद्रातील सहा गावांचा समावेश आहे.
.......
ग्रामस्थांनी काय केले?
कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता खबरदारी बाळगली. प्रत्येकाने मास्कचा वापर, सामाजिक अंतर पाळणे, बाहेरून कोणताही भाजीपाला न आणणे किंवा इतर खाद्यपदार्थ आणून देणे, बाहेरच्या लोकांना गावात प्रवेश करू दिला नाही. लॉकडाऊनचे पालन करीत गावातील लोक बाहेर निघाले नाही. आपल्या गावातच उपलब्ध साधना सामुग्रीतून आपल्या गरजा भागविण्याचा प्रयत्न केला. गावकऱ्यांनी कोरोनाला न घाबरता सतर्कता बाळगली. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत झाली.
.......
कोट
राज्यात दुसऱ्या लाटेचा वेग तीव्र असताना कोरोना गावाकडे पसरत चालला. ही बाब लक्षात घेऊन तालुक्यात आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांनी प्रत्येक घराला भेट देत कोरोनाबद्दल जागृती केली. त्यामुळे तालुक्यातील ४८ टक्के गावात कोरोना पोहोचला नाही. यात लोकांचा सहभाग पुरेपूर मिळाला
- डॉ. अमित खोडणकर, तालुका आरोग्य अधिकारी, सालेकसा