विधान परिषद निवडणूक : गोंदिया केंद्रावर जागेअभावी उडाली तारांबळ गोंदिया : नागपूर विभागीय शिक्षक मतदार संघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि.३) जिल्ह्यातील १० केंद्रांवर मतदान झाले. सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत मतदानाची वेळ असली असली जवळपास ५.३० वाजेपर्यंत मतदान चालले. जिल्हाभरात ९०.२१ टक्के मतदान झाले आहे. एकूण ३३२१ मतदारांपैकी २९९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदानादरम्यान दुपारी ३ वाजतानंतर गोंदिया तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर मतदानासाठी गर्दी वाढली. जागेच्या कमतरतेमुळे शिक्षकांची काही वेळासाठी चांगलीच तारांबळ उडाली. शिक्षकांची झालेली गर्दी पाहता तहसीलदार हिंगे यांनी तातडीने अतिरिक्त यंत्रणा लावून गैरसोय टाळण्याचा प्रयत्न केला. महिलांसाठी स्वतंत्र रांग असली तरी गर्दीमुळे महिला मतदारांना केंद्रात वर जाणेही अशक्य झाले होते. त्यामुळे काहींनी अर्ध्यापर्यंत जाऊन मतदान न करताच तेढून माघारी फिरणे पसंत केले. यावेळी माजी जि.प.उपाध्यक्ष विनोद हरिणखेडे, काँग्रेसचे सरचिटणीस अमर वराडे आदींनी, शिक्षक संघटनेचे रतन वासनिक व इतर पदाधिकाऱ्यांनी या गैरसोयीबद्दल नाराजी व्यक्त केली. मात्र काही वेळानंतर गर्दीचा जोर ओसरला आणि पुढील मतदान सुरळीत झाले. डॉ.आंबेडकर चौकातील तहसील कार्यालयाच्या जागेवर दोन वर्षांपासून प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सुरू असल्यामुळे गोंदिया तहसील कार्यालय सध्या न.प.च्या स्टेडियममधील वरच्या गाळ्यांमध्ये आहे. तिथे अपुरी जागा आहे. दुपारी ४ पर्यंतच मतदानाची वेळ असल्यामुळे दुपारी ३ पासून मतदार शिक्षकांची गर्दी वाढली. या केंद्रावर जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ८४३ मतदान होते. या गर्दीत महिला मतदारांची मोठी अडचण होत असल्यामुळे काहींनी मतदान न करता माघारी फिरणे पसंत केले. त्यांना शिक्षक संघटनांच्या नेत्यांनी पुन्हा मतदान केंद्रावर येण्याची विनंती केली. गर्दी ओसरल्यानंतर त्यांनी मतदान केले. मतदान केंद्राची प्रक्रिया निवडणूक विभागाकडून आधीच होत असल्यामुळे वेळेवर पर्यायी जागेत ते हलविणे शक्य नसते. त्यामुळे वेळेवर शक्य ती अतिरिक्त यंत्रणा लावून गैरसोय शक्य तितकी कमी होईल यासाठी प्रयत्न केल्याचे तहसीलदार हिंगे यांनी सांगितले. जिल्ह्यात सर्वाधिक ९७.५६ टक्के मतदान सडक अर्जुनी केंद्रावर तर सर्वात कमी ८० टक्के मतदान गोंदिया केंद्रावर झाले. (जिल्हा प्रतिनिधी)
जिल्ह्यात ९०.२१ टक्के शिक्षकांचे मतदान
By admin | Published: February 04, 2017 1:28 AM