गोंदिया : बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना देखभाल दुरुस्तीचे ९० लाख रुपये जिल्हा परिषदेने न दिल्यामुळे सदर योजना चालविण्यात अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे ही योजना ३० जून २०२१ पासून बंद करण्यात येत असल्याचे पत्र लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रा.लि. कंपनीने ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना दिले आहे. त्यामुळे ५० हजार नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होणार नाही.
बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना देखभाल दुरुस्तीचे काम करणाऱ्या लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेसला ऑक्टोबर २०१९ पासून मे २०२१ पर्यंत झालेल्या कामाचे देयके मिळालेले नाही. सध्या कोरोनाने थैमान घातलेले आहे. यामुळे लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस ही कंपनी आर्थिक अडचणीत सापडली आहे. त्यांच्याकडील मनुष्यबळ, ऑपरेटर, स्टाफ व तांत्रिक स्टाफ हे सर्व अडचणीत आले आहेत. त्यामुळे योजना चालू ठेवणे अवघड आहे. लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेसने वेळोवेळी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला पत्र देऊनही आर्थिक तरतुदीची व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे ९० लाख रुपये जिल्हा परिषदेकडे थकीत आहेत. त्यामुळे ही योजना चालविण्यास लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेसने नकार देत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला पत्र दिले आहे. आमगाव व सालेकसा तालुक्यांतील ४७ गावांतील ५० हजार नागरिकांना शुद्ध पाणी मिळत असल्याने त्या ५० हजार नागरिकांना शुद्ध पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. ३० जूनपासून या योजनेचा पाणीपुरवठा बंद करण्यात येत असल्याचे पत्र देण्यात आले आहे.