प्रफुल्ल पटेल यांचा आरोप : घोषणाबाज सरकार जिल्ह्यासाठी काही करणार की नाही?गोंदिया : यावर्षी आधीच धानाचा उतारा कमी आला आहे. त्यात धानाला योग्य भाव देण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. जिल्ह्यातील शेतकरी दोन्ही बाजुने पिसला जात असताना जेमतेम १० टक्के गावांची पैसेवारी ५० टक्केच्या कमी दाखवून ९० टक्के शेतकऱ्यांना कोणत्याही शासकीय लाभापासून वंचित ठेवले जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा.प्रफुल्ल पटेल यांनी केला.गोंदियात रविवारी पत्रकारांशी संवाद साधताना खा.पटेल शेतकऱ्यांच्या या परिस्थितीने व्यथित झाले होते. आम्ही सरकारमध्ये असताना जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी पैसेवारी योग्य पद्धतीने काढण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. पण आता खरी परिस्थिती लपवून ठेवून पैसेवारी जास्त दाखविल्या जात असून ९० टक्के शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडले, असे खा.पटेल म्हणाले.वास्तविक यावर्षी वरून पिक चांगले दिसत असले तरी कीडीमुळे धानाचा उतारा आला नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना या संकटातून सावरण्यासाठी दिलासा मिळणे गरजेचे आहे. आधीच धान खरेदी केंद्र उशिरा सुरू झाले. त्यात आमच्या काळात शेतकऱ्यांना मिळत होता तेवढाही दर एचएमटी, जय श्रीराम या वाणांना आता मिळेनासा झाला आहे. जिल्ह्यातील ९० टक्के गावांमधील पैसेवारी ५० टक्केपेक्षा जास्त दाखविल्यामुळे त्यांच्याकडील कर्जाची सक्तीने वसुली न करणे व इतर शासकीय लाभांपासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागणार आहे. गेल्या दिड वर्षातील सरकारच्या कामगिरीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करताना खा.पटेल म्हणाले, जिल्ह्यातील लोकांमध्ये सरकारबद्दल नैराश्य पसरत आहे. कारण सरकार घोषणा आणि मार्केटिंग करण्यात पटाईत असले तरी प्रत्यक्षात लोकांसाठी काय करीत आहे हे कोणालाच समजेनासे झाले आहे. जिल्ह्यातून मागास क्षेत्र विकास योजना बंद केली. राष्ट्रीय कृषी विकास योजना गुंडाळली. एमआरइजीएसचा निधी कमी केला, एपीएल कार्डधारकांचे धान्य, केरोसीन बंद केले. वाढत्या महागाईला तोंड देताना सर्वसामान्य लोकांच्या नाकी नऊ येत असल्याचे ते म्हणाले. यावेळी आ. राजेंद्र जैन उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)
९० टक्के शेतकऱ्यांना सोडले वाऱ्यावर
By admin | Published: January 18, 2016 2:03 AM