आमगाव : १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोरोनाप्रतिबंधक लस देणे सुरू होते. परंतु लसीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असल्याने दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेतील नागरिकांची ४५ ते ६० दिवसांची मुदत संपल्यामुळे दुसऱ्या डोसच्या नागरिकांना आल्यापावली परतावे लागत होते. त्यासोबतच ४५ पेक्षा जास्त वयोगटातील अनेक नागरिकांचे लसीकरण झालेले नाही. आता तालुक्याला ९०० डोस उपलब्ध झाल्याने २० मेपासून निर्धारित केंद्रात ४५ वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्यात येणार, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद चव्हाण यांनी दिली.
डोसेसचा तुटवडा निर्माण झाल्याने उन्हात तासन्तास उभे राहूनही नागरिकांना लस मिळत नव्हती. त्यामुळे नागरिकांमध्ये आरोग्य विभागाबाबत असंतोष निर्माण झाला होता. राज्यासह जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक अद्याप सुरू आहे. यामुळे प्रशासनाच्या उपाययोजनेंतर्गत कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी लसीकरण मोहीम राज्यात सुरू करण्यात आली. त्यातच लसीकरणासाठी लसीकरण केंद्रात नागरिकांची मोठी गर्दी आहे. त्यात अनेकांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा होती. त्यातच आता तालुक्यात ९०० डोस उपलब्ध झाल्याने ४५ च्यावर वयोगटातील नागरिकांना लस देण्याचे आदेश आहेत.
या केंद्रांचा समावेश
ग्रामीण रुग्णालय आमगाव, प्राथमिक आरोग्य केंद्र, बनगाव, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र किकरीपार, उपकेंद्र, दहेगाव, उपकेंद्र, गोरठा, पाऊलदौना ग्रामपंचायत, उपकेंद्र कवळी, गोसाईटोला कालीमाटी प्राथमिक आरोग्य केंद्र, सुपलीपार केंद्र येथे लसीकरण केले जाणार आहे.
-----------
ज्या नागरिकांचे लसीकरण झालेले नाही, अशा नागरिकांनी न घाबरता डोस घऊन सुरक्षित व्हावे. लसीकरण प्रक्रिया ऑफलाईन असून, रजिस्ट्रेशन केंद्रांवरच करण्यात येईल. ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.
डॉ. विनोद चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी