गोंदिया : खनिजाची चोरी करून शासनाचा महसूल बुडविणाऱ्यांना देवरीचे तहसीलदार विजय बोरुडे यांनी चांगलाच दणका दिला आहे. चार प्रकरणात ९२ लाख ५६ हजार ८०० रुपयाचा दंड ठोठावला आहे. तहसीलदार बोरुडे यांच्या धडक कारवाईमुळे गौण खनिज चोरी करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. तहसीलदाराला जे जमले ते इतर तहसीलदारांना का जमले नाही हा एक संशोधनाचा विषय आहे. पहिल्या प्रकरणात एक लाख ५४ हजार, दुसऱ्या प्रकरणात १२ लाख ७० हजार, तिसऱ्या प्रकरणात ७० लाख ७० हजार ८०० रुपये, तर चौथ्या प्रकरणात सात लाख ६२ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
नवाटोला-भरेगाव येथील गोंडवाना वेब्रिज पटांगणावर १० ब्रास बोल्डर विनापरवानगीने साठा करणाऱ्या झामसिंग येरणे यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. १० ब्रास बोल्डरच्या पाचपट म्हणजेच एक लाख ५४ हजार रुपयांचा रुपयाचा दंड झामसिंग येरणे यांच्यावर आकारला आहे. देवरीच्या एमआयडीसी परिसरात ५० ब्रास रेती मनीष अग्रवाल याने साठवून ठेवली होती. बाजार भावाच्या पाचपट म्हणजेच १२ लाख ७० हजार रुपयांचा दंड मनीष अग्रवाल याच्यावर आकारलेला आहे. डव्वा येथील ज्ञानेश्वर झाडूजी ठाकरे यांच्या बोरगाव-बाजार येथील जागेवर राधारमण अग्रवाल (रा. गोंदिया) याने ७० टिप्पर रेती म्हणजेच प्रत्येक टिप्परमध्ये सहा ब्रास असे ४२० ब्रास रेती व ६० ब्रास बोल्डर विनापरवानगीने बोरगाव-बाजार येथे साठवून ठेवले होते. बाजार भावाच्या पाचपट दंड म्हणजेच ७० लाख ७० हजार ८०० रुपये दंड त्यांना आकारण्यात आला आहे. देवरी येथील अनिल झामसिंग येरणे यांनी ३० ब्रास रेतीचा साठा देवरीच्या छत्रपती शाळे मागील पटांगणावर करून ठेवला होता. त्यामुळे अनिल येरणेवर सात लाख ६२ हजार रुपयांचा दंड तहसीलदार बोरुडे यांनी आकारला आहे. गुरुवारी (दि.२७) ही कारवाई करण्यात आली आहे.