गोंदिया : मागील दोन महिन्यांत जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे आटोक्यात आला आहे. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या आता दोनवर आली आहे. जिल्ह्यातील ९३६ गावांपैकी ९३४ गावे पूर्णपणे कोरोनामुक्त झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना ॲक्टिव रुग्ण गोंदिया येथे होते. त्यामुळेच हा तालुका कोरोनाचे हॉटस्पाॅट झाला होता. मात्र, आता हा तालुकासुद्धा पूर्णपणे कोरोनामुक्त झाला आहे. सालेकसा आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केवळ दाेन गावांत कोरोनाचे दोन रुग्ण आहे. त्यामुळे हा तालुकासुद्धा लवकरच कोरोनामुक्तीच्या मार्गावर आहे. हा रुग्ण बरा झाल्यास जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त होणार आहे. तब्बल दीड वर्षानंतर जिल्हा कोरोनामुक्त होणार आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत ४११९४ कोरोनाबाधित आढळले त्यापैकी ४०४८५ बाधितांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन आणि जिल्हावासीयांनी घेतलेली काळजी यामुळेच जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे म्हटल्यास वावगे होणार नाही. जिल्ह्यातील दोन रुग्णांचे नमुने डेल्टा प्लसच्या अनुषंगाने दोन रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाच्यावतीने या दोन्ही गावांतील रुग्णांचे नमुने तपासणी करण्यात आले. यापैकी सर्वांचे नमुने निगेटिव्ह आल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला. जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू असली तरी जिल्हावासीयांना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून पूर्वीइतकीच काळजी घेण्याची गरज आहे.
......................
जिल्ह्यातील कोरोनामुक्त गावे
तालुका : गावे
गोंदिया रावणवाडी, नागरा, खातिया, दवनीवाडा, पांजरा, धापेवाडा
तिरोडा काचेवानी, लोधीटोला, परसवाडा, चांदणीटोला, गोंडमोहाडी
सालेकसा झालिया, कावराबांध, सोनपुरी, दरेकसा, गोवारीटोला,
गोरेगाव तिल्ली, मोहगाव, निंबा, तेढा, सोनी, कुऱ्हाडी, मुंडीपार
अर्जुनी मोरगाव : इसापूर, बोंडगावदेवी, झरपडा, बाराभाटी, केशोरी
देवरी : लोहारा, सिरपूर, चिचगड, पालांदूर जमी, ककोडी,
सडक अर्जुनी : वडेगाव, खोडशिवणी, पांढरी, कोसमतोंडी, सौंदड, कोहमारा
आमगाव : तिगाव, चिरचाळबांध, भोसा, पद्मपूर, किकरीपार,
..........................................
दररोज पाचशे चाचण्या
कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याने जिल्ह्यात चाचण्यांचे प्रमाणसुद्धा बरेच कमी झाले आहे. सध्या कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने दररोज ७०० चाचण्या केल्या जात आहेत. त्यात एक ते दोन पॉझिटिव्ह आढळत आहेत. त्यामुळे पॉझिटिव्हिटी रेट सुद्धा फारच कमी झाला आहे. कोरोना बाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याने कोरोनाचा रिकव्हरी रेट ९९ टक्क्यांवर आहे, ही जिल्हावासीयांसाठी दिलासादायक बाब आहे.
..............
जिल्ह्यातील हाॅटस्पॉट गावांची संख्या शून्यावर
जिल्ह्यात तिरोडा, गोंदिया या दोन्ही तालुक्यांत कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक होते. त्यामुळे हे दोन्ही तालुके कोरोनाचे हाॅटस्पॉट झाले होते. मात्र, मागील दोन महिन्यांत कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आल्याने आता दोन्ही तालुक्यांत एकही कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण नाही. त्यामुळे जिल्ह्यात एकही कोरोनाच्या अनुषंगाने एकही गाव कोरोनाचे हाॅटस्पॉट नाही.
......