अंकुश गुंडावार
गोंदिया : पूर्व विदर्भात सर्वाधिक धानाचे उत्पादन घेतले जाते जाते. सिंचनाची सोय आणि धानपिकांसाठी अनुकूल वातावरण हे त्या मागील कारण आहे. तसेच पूर्व विदर्भात माजी मालगुजारी तलाव (मामा) मोठ्या प्रमाणात आहे. या मामा तलावांची शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठी मदत होते. परंतु या तलावांच्या संवर्धनाकडे लघु पाटबंधारे विभाग आणि जि.प.चे दुर्लक्ष झाल्याने पूर्व विदर्भातील ९७८ मामा तलाव गायब झाल्याची बाब पुढे आली आहे.
पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मामा तलावांची संख्या सर्वाधिक आहे. मामा तलावांची संख्या अधिक असल्याने हे जिल्हे तलावांचे जिल्हे म्हणून ओळखले जातात. या तलावांमुळे मासेमारी आणि दुबार पीक घेण्यासाठी सुध्दा शेतकऱ्यांना मदत होत असते. पूर्वी या मामा तलावांचा मालकी हक्क त्या गावातील मालगुजरांकडे होता. त्यानंतर सरकारने या तलावांचा मालगुजारी हक्क संपुष्टात आणला. शंभर हेक्टरपर्यंतचे तलाव जिल्हा परिषदेकडे आणि त्यापेक्षा अधिक क्षेत्र असलेले तलाव लघु पाटबंधारे विभागाकडे हस्तांतरीत केले. मात्र कालातंराने या तलावांकडे दोन्ही विभागांचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे काही तलावांवर अतिक्रमण झाले. तर काहींनी तलावात शेती करुन हे तलावच गायब करुन टाकले. मात्र मागील तीन-चार वर्षात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीनंतर या मामा तलावांचे महत्त्व शासनाला कळायला लागले. त्यानंतर राज्य सरकारने मामा तलावांचे संवर्धन करण्यासाठी पाऊले उचलली. या तलावांचे संवर्धन आणि पुनरुज्जीवित करण्यासाठी पावले उचलली. लघु पाटबंधारे विभाग आणि जिल्हा परिषदेच्या यंत्रणेने तलाठ्यांच्या रेकाॅर्डनेुसार नोंद असलेल्या मामा तलावांची गणना केली.
त्यात एकूण ६७३४ मामा तलावांपैकी प्रत्यक्षात ५७५६ मामा तलावच अस्तित्वात असल्याची बाब पुढे आली. तर सर्वाधिक मामा तलावांवर गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात अतिक्रमण झाले असल्याची बाब पुढे आली. दरम्यान, हा अहवाल सुध्दा राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. मात्र अद्यापही यावर कुठलीच कारवाई करण्यात आली नाही.
....................
संवर्धन करणार केव्हा
बरेचदा शेतकऱ्यांना एका पाण्याने पिके गमाविण्याची वेळ येते. तेव्हा या मामा तलावांची शेतकऱ्यांना पिके वाचविण्यासाठी मोठी मदत होते. मात्र मागील दहा-पंधरा वर्षांपासून मामा तलावांच्या संवर्धनाकडे जिल्हा परिषद आणि लघु पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष झाले. त्यामुळेच सिंचनासाठी महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या तलावांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.
.............
जिल्हानिहाय मामा तलावांची संख्या
जिल्हा गणनेपूर्वी गणनेनंतर
भंडारा १४८४ १०२५
गोंदिया १७९८ १३९२
चंद्रपूर १६७८ १६७८
गडचिरोली १६६८ १६४५
नागपूर २१६ २१६
.........................................................
एकूण ६८३४ ५८५६