गोंदिया - गोरेगाव तालुक्यातील नंमरीश रंजीत ठाकूर वय 16 वर्षे राहणार बोटे हा रस्त्याचा कडेला उभा असताना गोरेगाव वरून आमगावकडे जाणाऱ्या बोलेरो गाडीने त्याला धडक दिली. धडक एवढी जबरदस्त होती की नंमरीश या युवकाचा जागीच घटनास्थळी मृत्यू झाला. या संदर्भात गावकऱ्यांनी रोष व्यक्त करीत चक्काजाम आंदोलन केला आहे.
आज दिनांक 19 डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान नंमरिश घरासमोरील रस्त्यावर उभा असताना गोरेगाव कडून आमगाव कडे जाणाऱ्या बोलेरो गाडीने धडक दिली. सदर गाडी ही हैदराबाद वरून कामासाठी मजूर घेवून लांजीकडे जात असल्याची माहिती पुढे आली आहे. गोरेगाव सोनी रस्त्यावर बोटे येथे अपघात होताच घटनास्थळावरून वाहन चालकाने गाडीसह पळ काढला. यातच हैदराबाद वरून लांजी कडे जाणाऱ्या दोन गाड्यांना गावकऱ्यांनी अडवून ठेवले , असून घटनास्थळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.
गावकऱ्यांचा रोष पाहता गोंदियावरून पोलिसांची अतिरिक्त कुमक बोलविण्यात आलेली आहे. गोरेगाव ते सोनी हा रस्ता अरुंद असल्याने व रस्त्याच्या दोन्ही कडेला माती मिश्रित मुरूम असल्याने रस्त्यावरून ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागते. गेल्या अनेक वर्षापासून गोरेगाव सोनी रस्त्याचा प्रश्न प्रलंबित असताना प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे पुन्हा एका जीवाला मुकावे लागले. या संदर्भात बोटे येथील गावकऱ्यांनी बातमी लिहीपर्यंत चार तासापासून चक्काजाम आंदोलनाला सुरुवात केली असून प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला आहे. जोपर्यंत आरोपीवर कारवाई होत नाही, जोपर्यंत आरोपी जेरबंद होत नाही तोपर्यंत चक्काजाम आंदोलन सुरूच राहील असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे. सोबतच रस्त्याचा प्रश्नही या निमित्त सोडविण्यात यावा अशी मागणी ही गावकऱ्यांनी लावून धरली आहे. यावेळी गावातील पाचशेच्या वर नागरिकांनी रस्ता रोखून धरला असून रस्त्याच्या मधोमध लाकडे ठेवली आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक गेल्या चार तासापासून खोळंबलीं असून आता प्रशासन या दिशेने काय पाऊल उचलते, काय कारवाई करते याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.