गोंदिया : नळ जोडणी व पाईपलाईन विस्तारीकरण कामाचे बिल काढून देण्यासाठी लाचेची मागणी करून १० हजार रूपयांची लाच स्वीकारणाऱ्या ग्रामसेवकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. शुक्रवारी (दि.२) देवरी येथील पंचायत समिती कार्यालयाच्या गेटमध्येच ही कारवाई करण्यात आली. बंडू मारोतकारव कैलुके असे लाचखोर ग्रामसेवकाचे नाव आहे.
सविस्तर असे की, तक्रारदाराचे मामा कंत्राटदार असून त्यांना जल जीवन मिशन वैयक्तीक नळ जोडणी व पाईपलाईन विस्तारीकरणाचे काम मिळाले आहे. त्यांनी तक्रारादारास करारनामा करून गटग्रामपंचायत कडीकसा अंतर्गत कामाचे अधिकार दिले आहेत. त्यानुसार, तक्रारदारांचे कडीकसा व गणूटोला या दोन्ही गावांत काम सुरू असून कडीकसा येथील रनिंग बिल त्यांना मिळाले आहे. मात्र गणूटोला येथील पहिल्या टप्प्यातील काम झाले असून सुमारे २,४५,००० रूपयांचे रनिंग बिल ग्रामपचायतला टाकले असून ते मंजूर झाले आहे. त्याचा धनादेशबाबत विचारणा करण्यासाठी ३० ऑगस्ट रोजी तक्रारदार ग्रामपंचायतमध्ये गेले असता ग्रामसेवक कैलुके याने कडीकसा येथील बिल काढून दिल्याचे व गणूटोला येथील बिल काढून देण्यासाठी एकूण १८००० रूपयांची मागणी केली. यावर तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे शुक्रवारी (दि.२) तक्रार नोंदविली.
तक्रारीच्या आधारे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी करून देवरी येथे पंचायत समिती कार्यालयाच्या गेटमध्येच दुपारी सापळा लावला. यामध्ये ग्रामसेवक कैलुके याने लाचेची मागणी करून तडजोडीअंती १०००० रूपयांची लाच स्वीकारताना पथकाने त्याला रंगेहात पकडले. कैलुकेवर देवरी पोलिसांत भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम ७ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे