संतोष बुकावन
अर्जुनी मोरगाव (गोंदिया) : गडचिरोली जिल्ह्याच्या जंगलात वास्तव्यास असलेले गजराज गोंदिया जिल्ह्यात दाखल झाले आहेत. शंकरपूर, बोळदे मार्गे ते शनिवारी (दि.२४) अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या खोळदा गावानजीकच्या जंगलात अनेकांनी बघितले आहेत. काही प्रमाणात शेतातील धानपिकाचे नुकसान केल्याचेही सांगितले जात आहे.
आसाम राज्यातील माहूत महाराष्ट्रातील लोकांना पूर्वी गजराजचे दर्शन घडवीत असत. मात्र आता प्रत्यक्षात गजराजाचे दर्शन म्हणजे या परिसरातील लोकांना एक पर्वणीच ठरावी असे आहे. त्यामुळे स्थानिकांची गजराजच्या दर्शनासाठी रीघ लागली होती. काहींना दर्शन घडले तर काहींचा हिरमोड झाला. गडचिरोली जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्याकडे आगेकूच केल्याची सूचना वनविभागाला यापूर्वीच होती. केशोरीच्या वनक्षेत्रपालांनी खबरदारीची सूचना एका पत्राद्वारे सरपंचांना दिली होती. गजराजांचा प्रवेश शुक्रवारी रात्री बोळदा येथून झाल्याचे समजते.
बोळदा हे गडचिरोली-गोंदिया जिल्ह्याच्या सीमेवर असून ते गडचिरोली जिल्ह्यात येते. तर खोळदा हे गाव गोंदिया जिल्ह्यात येते. खोळदा ते बोळदा दरम्यानच्या जंगलात लोकांनी गजराज बघितले आहेत. त्यानंतर वडेगाव बंध्या हे गाव येते. येथील शेतशिवारात धानपिकाचे नुकसान केल्याचेही सांगण्यात येते. खोळदा नजीक गाढवी नदी आहे. हे गजराज नदी ओलांडून बोरी या गावाकडे कूच करतात की वडेगाव बंध्या मार्गे केशोरीकडे वळतात यावर वनविभाग लक्ष ठेऊन आहे. येथूनच ते माघारी सुद्धा परतण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुमारे २० गजराजांची ही झुंड असल्याचे सांगितले जाते.